ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षक ब्रॅड हॉजने अखेर आपल्या वक्तव्यावर माफीनामा सादर केला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीबद्दल केलेल्या विधानावर हॉजने जाहीर माफी मागितली आहे. कोहलीने आयपीएलमध्ये खेळता यावे यासाठीच धरमशाला कसोटीत विश्रांती घेतले असा वादग्रस्त आरोप ब्रॅड हॉजने केला होता. रांची कसोटीत उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने कोहली अखेरची कसोटी खेळू शकला नव्हता. मात्र, हॉज यांनी अर्थाचा अनर्थ करत कोहलीला विश्रांती हवी होती म्हणून तो मुद्दाम धरमशाला कसोटीत खेळला नाही, असे तर्कट हॉजने मांडले. हॉजच्या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनीही हॉजचे वर्तव्य दुर्देवी असल्याचे सांगत कोहली संघात नसतानाही ऑस्ट्रेलियाचा जिंकू शकत नाही हे दाखवून दिले, असा टोला त्यांनी लगावला.

वाचा: विराट कोहलीने आयपीएलमध्ये खेळण्यासाठीच विश्रांती घेतली; ब्रॅड हॉजचा आरोप

कोहलीबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाची जाणीव झाल्यानंतर हॉजने आपल्या ट्विटर हॅण्डलवर माफीनामा सादर केला. मी स्वत: एक क्रिकेटपटू असल्याने एका महत्त्वाच्या सामन्यावेळी मैदानाबाहेर बसावं लागण्याचं दु:ख मी समजू शकतो. त्यामुळे कोहलीबद्दल केलेल्या विधानाबद्दल मी संपूर्ण देशाची आणि मुख्यत्वे कोहलीची वैयक्तिकरित्या माफी मागतो. एखाद्या व्यक्तिच्या भावना किंवा राष्ट्रप्रेम दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही, असे हॉजने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे. भारताने मला आजवर खूप प्रेम आणि आनंद दिला आहे. विराट कोहलीसारखा उच्चदर्जाचा खेळाडू या क्रिकेट जगताला मिळणे हे खरंच भाग्य आहे. मी त्याच्या खिलाडूवृत्तीचा आदर करतो, असेही हॉज म्हणाला.