पाकिस्तानवर ६-२ असा दणदणीत विजय
हरमनप्रीत सिंगचे चार गोल
भारतीय पुरुष संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचे ६-२ असे वस्त्रहरण करून कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पध्रेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. हरमनप्रीत सिंगने सातत्यपूर्ण खेळाचा नजराणा पुन्हा एकदा सादर करताना चार गोल केले. त्याला अरमान कुरेशी आणि मनप्रीत यांनी प्रत्येकी एक गोल करुन चांगली साथ दिली. या जेतेपदाबरोबर भारताने १९९६ मध्ये अंतिम लढतीत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. आशिया चषक स्पध्रेतील भारताचे हे तिसरे जेतेपद आहे. याआधी त्यांनी २००४ आणि २००८ मध्ये जेतेपद पटकावले होते.
मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या सुलतान जोहोर चषक स्पध्रेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पध्रेचा अनुभव पाठीशी असलेल्या भारतीय संघाने आशिया चषक स्पध्रेत दमदार कामगिरी केली. अंतिम लढतीत पाकिस्तानवर सुरुवातीपासून आक्रमण करून भारताने सामन्यावर पकड घेतली. १०व्या मिनिटाला उगवता तारा हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरची संधी अचूक हेरून भारताचे गोल खाते उघडले. पाच मिनिटांत त्याची पुनरावृत्ती करून हरमनप्रीतने भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. मात्र, २८व्या मिनिटाला पाकिस्तानकडून पलटवार झाला. मुहम्मद याकुबने मैदानी गोल करताना गोलफरक १-२ असा कमी केला. या गोलने चैतन्य संचारलेल्या पाकिस्तान संघाचा उत्साह क्षणिक ठरला. ३०व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करून हॅट्ट्रिक साजरी केली. मध्यंतराला भारताकडे ३-१ अशी निर्णायक आघाडी होती. त्यामुळे पाकिस्तानवर प्रचंड दडपण जाणवत होते आणि याच दडपणाखाली त्यांच्याकडून असंख्य चुका झाल्या. भारताने त्या हेरून गोलसपाटा कायम राखला. ४४व्या मिनिटाला अरमान कुरेशीने मैदानी गोल करून भारताच्या आघाडीत भर टाकली. त्यात ५०व्या मिनिटाला मनप्रीतने गोल करून भारताला ६-१ अशा मजबूत स्थितीत आणले. पाकिस्तानकडून मुहम्मद दिलबेरने (६८ मि.) अखेरचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पराभव टाळता आला नाही.