यजमान यू मुंबाला पराभवाचा धक्का

जयपूर पिंक पँथर्सने गतविजेत्या पाटणा पायरेट्सचा २९-२२ अशा फरकाने पराभव करून प्रो कबड्डी लीगची उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. अजय कुमार जयपूरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र पंचांचे वादग्रस्त निर्णय आणि कबड्डीरसिकांनी त्यांची उडवलेली हुर्यो यामुळे या लढतीला गालबोट लागले. दुसऱ्या लढतीत बंगाल वॉरियर्सने यजमान यू मुंबाला ३१-२६ असा पराभवाचा धक्का दिला.

वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पहिल्या सत्रात पाटण्याने ११-९ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात जयपूरने दोन लोण चढवत वर्चस्व गाजवले. अजयने चढायांचे सात गुण मिळवून जयपूरच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अमित हुडाने (५ गुण) दिमाखदार पकडी करून त्याला छान साथ दिली. पाटण्याकडून प्रदीप नरवालने अप्रतिम चढाया केल्या.

सामन्यातील पंचांच्या निर्णयाविषयी विचारले असताना जयपूरचा कर्णधार जसवीर सिंग म्हणाला की, ‘‘कबड्डी हा अतिशय वेगवान खेळ आहे. त्यामुळे काही गोष्टी नजरेतून निसटू शकतात. पंच म्हणजे परमेश्वर नसतो. त्यामुळे त्यांच्याकडूनसुद्धा चुका होऊ शकतात.’’

यू मुंबाविरुद्धच्या सामन्यात बंगालने पहिल्या सत्रात ११-९ अशी माफक आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सत्रात बंगालने यू मुंबावर लोण चढवून आपली आघाडी वाढवली. या धक्क्यातून यू मुंबाने सावरून एक मिनिट शिल्लक असताना लोणची परतफेड केली; परंतु त्यांचे अखेरच्या मिनिटांतील प्रयत्न विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ’ जँग कुन ली आणि मोनू गोयत यांच्या चढायांनी बंगालच्या विजयाचा अध्याय लिहिला, तर गिरीश इर्नाकने अप्रतिम पकडी केल्या.  पूर्वार्धात अपयशी ठरलेल्या यू मुंबाच्या रिशांक देवाडिगाने दुसऱ्या सत्रात नेत्रदीपक चढाया केल्या.

आजचे सामने

  • पुणेरी पलटण वि. पाटणा पायरेट्स
  • यू मुंबा वि. बंगळुरू बुल्स
  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी २, ३