सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूच्या पराभवानंतर जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुषांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मात्र पुरुष दुहेरी स्पर्धेत भारताच्या प्रणव चोप्रा आणि सिकी रेड्डी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताचं आव्हान कायम ठेवलं आहे.

पुरुष एकेरीत भारताची निराशा –

पहिल्या सामन्यात भारताच्या एच. एस. प्रणॉयचा चीनच्या शी युकीविरुद्ध सामना झाला. यात सरळ दोन सेट्समध्ये प्रणॉयला पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्या ४५ मिनीटात प्रणॉयला शी युकीविरुद्ध हार पत्करावी लागली. युकीच्या आक्रमक खेळाचं उत्तर प्रणॉयच्या खेळीत दिसलं नाही.

किदम्बी श्रीकांतकडून भारतीयांना खूप आशा होत्या. मात्र डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेनने श्रीकांतला २१-१७, २१-१७ अशी मात देत भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. पहिल्या सेटमध्ये श्रीकांत आणि व्हिक्टरमध्ये चुरशीची लढत होत होती. पहिल्या सेटच्या उत्तरार्धापर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये १७-१७ अशी आघाडी होती. मात्र अखेरच्या क्षणी व्हिक्टरने सेटमध्ये बाजी मारत श्रीकांतला धक्का दिला. दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये अशाच प्रकारची लढत झाली, मात्र व्हिक्टरची झुंज मोडून काढण्याच श्रीकांतला यश आलं नाही.

प्रणव चोप्रा – सिकी रेड्डीचा आश्वासक खेळ –

मात्र पुरुष दुहेरी प्रकारात भारताचं आव्हान अद्यापही कायम आहे. प्रणव चोप्रा आणि सिकी रेड्डी या जोडीने जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोरियाच्या सियाँग जे सिओ आणि किम हा ना या जोडीचा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. जवळपास तासभर चाललेल्या सामन्यात प्रणव आणि सिकी रेड्डीने अखेरपर्यंत झुंज देत सामन्यात बाजी मारली.

उपांत्य सामन्यात प्रणव आणि सिकी रेड्डीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि सायाका हिरोता या जोडीशी होणार आहे. जपानची जोडी ही या स्पर्धेत अनसिडेड आहे, त्यामुळे या जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची दोन्ही भारतीय खेळाडूंकडे चांगली संधी आहे.