परंपरा जपण्यासाठी कबड्डीपटूंची हाक

कबड्डीसारख्या मराठमोळय़ा खेळाचे मातीशी ऋणानुबंधाचे नाते आहे. परंतु राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षितिजावर तळपायचे तर मॅटच हवा, अशी समजूत करून घेतल्यामुळे कबड्डीपटू मातीत सराव करून घडतोय, परंतु कालांतराने मॅटवरील खेळालाच महत्त्व देऊ लागल्याचे दिसून येत आहे. मात्र कबड्डी खेळाची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी मातीचेही मोल राहू दे, अशी हाक कबड्डीपटूंनी दिली आहे.

१९९०मध्ये बीजिंग आशियाई क्रीडा स्पध्रेच्या निमित्ताने कबड्डीने पहिले आंतरराष्ट्रीय पाऊल टाकले. ती स्पर्धा मातीवर झाली होती. त्यानंतर १९९४मध्ये झालेल्या हिरोशिमा आशियाई स्पध्रेपासून मॅटचा वापर सुरू झाला. अगदी २००४, २००७ आणि २०१६चे पुरुषांचे आणि २०१२मध्ये झालेली महिलांची विश्वचषक कबड्डी स्पर्धाही मॅटवर खेळवण्यात आली होती. गेली अनेक वष्रे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा मॅटवरच होत आहेत. मात्र जिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धा बऱ्याचदा मातीवर होतात. मॅट अनुपलब्ध असल्यामुळे किंवा काही वेळा वातावरणाच्या प्रभावामुळे मॅटवर खेळणे त्रासदायक ठरल्याने मातीवर खेळावे लागते. अगदी देशभरात कार्यरत असलेल्या अनेक व्यावसायिक आणि स्थानिक संघांचा सरावसुद्धा मातीवरच होतो. मुंबईत व्यावसायिक नोंदणी असलेल्या बडय़ा संघांनाही मॅटवर सराव करणे शक्य होत नाही. काही मोजक्या संघांकडे असलेले मॅट्स सोडले तर कबड्डीचे प्राथमिक कौशल्य हे खेळाडूंना मातीवरच आत्मसात करावे लागते.

टेनिसच्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रचलित आहेत. विम्बल्डन हिरवळीवर, तर अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा हार्ड कोर्टवर रंगते. परंतु लाल मातीवर होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पध्रेचा रुबाब अजूनही या खेळाने टिकवून ठेवला आहे. नेमकी हीच गोष्ट कबड्डीनेसुद्धा गांभीर्याने जोपासायची गरज आहे. मात्र मॅटऐवजी मातीवर स्पर्धा घ्यायच्या म्हणजे आपण खेळाचा प्रवास अधोगतीने करायला लागू, अशी भारतीय हौशी कबड्डी महासंघांमधील तथाकथित धुरीणांची धारणा झाली आहे.

कबड्डीसाठी कोणताच खर्च नसतो. तो सर्वसामान्यांचा खेळ आहे, अशी त्याची ओळख होती. परंतु आता मॅटमुळे तो महागडा होतो आहे. माती व मॅट यांच्यातील फरक समजून घेतला पाहिजे. मॅट आणि शूज यांची व्यवस्था करणे सर्वानाच जमते का? आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे तर मॅटशिवाय पर्यायच नाही, अशा प्रकारे कबड्डीत बिंबवले जात आहे, ते चुकीचे आहे. सराव करायला मॅट उपलब्ध होणे आणि ते मिळाल्यास ठेवायचे कुठे, हे प्रश्न सोपे नाहीत. मॅटच्या साहाय्याने जागतिक प्रसाराला निघालेल्या धुरीणांना या वेगात मातीच्या कबड्डी स्पर्धाकडे गांभीर्याने पाहायला राष्ट्रीय आणि राज्य संघटनांना मुळीच वेळ दिसत नाही.

माया आक्रे-मेहेर, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू

कबड्डीच्या विकासाची कास धरून बऱ्याचशा अन्य देशांना खेळाकडे वळवण्यासाठी मॅटचा आग्रह धरला जातो, यात काही चुकीचे नाही. हल्ली प्रो कबड्डी लीग सुरू झाल्यापासून व्यावसायिक खेळाडू मॅटला अधिक सरावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेचशे खेळ कृत्रिम मैदानांवर खेळवले जातात. टेनिसमध्ये जसे विविध कोर्टसना तितकेच महत्त्व दिले जाते, तसे कबड्डीमध्ये द्यायला काहीच हरकत नाही. फ्रेंचने माती, विम्बल्डनने हिरवळ जपली आहे. तशी कबड्डीमध्येही मातीवरील आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकते. मातीची परंपरा जपायला हवी.

राजू भावसारअर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू, प्रशिक्षक

आंतरराष्ट्रीय स्पर्धा गेली अनेक वष्रे मॅटवरच होत आल्या आहेत. १९९९मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा काठमांडू येथे मातीवर झाल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे मैदान खराब झाले आणि मग ते सुधरवण्याची पद्धती पाहून पाकिस्तान आणि इराणच्या संघाने त्यावर खेळायला अनुत्सुकता दर्शवली होती. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मातीवरील स्पर्धासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. मातीमुळे अपाय होईल, अशी भीती काही संघांवर होती. परंतु मॅट ही खेळाडूंसाठी मातीपेक्षा धोकादायक असते. मॅटवरील दुखापती या सांध्यांना इजा पोहोचवू शकतात, तर मातीवर खरचटणे वगैरेसारख्या मामुली दुखापती होतात. दररोज मॅटवर खेळणे, हे खेळाडूच्या कारकीर्दीसाठी हानीकारक आहे. त्यामुळे मातीवरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेची नितांत गरज आहे.

जया शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशासक, खेळाडू