महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा इराणसोबत पंगा घेणार आहे. महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली २००४ आणि २००७ मध्ये पुरुषांच्या पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये दोन्ही वेळा इराण आणि भारत हे दोन संघच समोरासमोर दिसले होते. भारताने इराणवर निर्विवाद वर्चस्व मिळवत दोन्हीवेळा विश्वचषकावर कब्जा मिळविला. भारताने ही विजयी गाथा पुन्हा एकदा कायम राखावी म्हणून ट्विटरकर भारतीय संघाला प्रोत्साहीत करताना दिसत आहे. ट्विटरवर सध्या ‘फायनल राइड’ हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे. अहमदाबादच्या मैदानावर दोन्ही संघ उतरण्यापूर्वी भारतीय संघावर ट्विटरकरांकडून सामन्यासाठी शुभेच्छा मिळत आहेत.

भारताने पहिल्या विश्वचषकामध्ये इराणला ५५-२७ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत पहिल्या विश्वकपावर शिक्कामोर्तब कला होता. त्यानंतर तब्बल तीन वर्षाच्या खंडानंतर मुंबईमध्ये दुसऱ्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले. यावेळीही इतर संघाच्या तुलनेत पहिल्या विश्वचषकामध्ये दावेदारी सिद्ध केलेल्या भारत आणि इराक दुसऱ्यांदा समोरा समोर आले. यावेळीही भारताने विजय मिळवत इराणला पराभूत केले. पनवेलच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इराणला २९ – १९ अशा फरकाने पराभूत केले होते.
भारताच्या मागील विश्वचषकातील कामगिरीमुळे भारतीय कबड्डी संघ पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालून विजयाची हॅट्रिक साजरी करेल अशी आस भारतीयांना आहे. ट्विटरवर वरुन भारतीय संघाला मिळणारा पाठिंबा याची प्रचिती करुन देतो.