करुण नायर (८०) आणि मनीष पांडे (नाबाद ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कर्नाटकने इराणी चषक क्रिकेट स्पध्रेच्या तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४१ धावांची मजल मारून मोठय़ा आघाडीकडे वाटचाल केली आह़े  कर्नाटकने दुसऱ्या डावात सावध सुरुवात करताना शेष भारत संघाविरुद्ध ३२१ धावांची आघाडी घेतली आह़े   
बिनबाद ३९ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या कर्नाटकला १४व्या षटकात पहिला धक्का बसला़  सलामीवीर मयांक अग्रवालला (२८) वरुण आरोनने माघारी धाडून शेष भारताला पहिले यश मिळवून दिल़े  त्यानंतर मात्र, रवीकुमार समर्थ आणि अभिषेक रेड्डी यांनी कर्नाटकचा डाव सांभाळला़   प्रग्यान ओझाने रेड्डीला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली़  त्यानंतर आलेला रॉबीन उथप्पाही (६) आरोनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला़   पण त्यानंतर करुण नायरने सलामीवीर समर्थसह कर्नाटकची धुरा सांभाळली़    ५२व्या षटकात १५९ चेंडूंत १० चौकारांसह ८१ धावा करणाऱ्या समर्थला शार्दुल ठाकुरने त्रिफळाचीत करून माघारी धाडल़े  मात्र, मनीष पांडेने नायरला योग्य साथ देत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली़  नायरने १२३ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ८० धावा केल्या़  त्याला ओझाने पायचीत केल़े  श्रेयस गोपाळ धावांचे खाते न उघडताच माघारी परतला़ विनय कुमारने पांडेसह दिवसअखेपर्यंत खिंड लढवत संघाला ३४१ धावांचा पल्ला गाठून दिला़