टॉटनहॅमने विजयाचा घास हिरावला

लिव्हरपूल क्लबला शनिवारी व्हाईट हार्ट लेन येथे झालेल्या इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) लढतीत टॉटनहॅम हॉटस्पूरने १-१ अशा बरोबरीत रोखून एका गुणावर समाधान मानण्यास भाग पाडले. सामन्याच्या ७०व्या मिनिटापर्यंत १-० अशा आघाडीवर असलेल्या लिव्हरपूलच्या मार्गात डॅनी रोझने अडथळा आणला. ७३व्या मिनिटाला एरिक लॅमेलाने हेडरद्वारे टोलावलेला चेंडू रोझने अचूक हेरून गोलजाळीत टोलावला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर टॉटनहॅमने संयमी खेळ करताना निर्धारित ९० मिनिटांपर्यंत ही बरोबरी कायम राखण्यात यश मिळवले.

टॉटनहॅमला ईपीएल स्पध्रेत लिव्हरपूलविरुद्ध गेल्या सात सामन्यांत पाच पराभवांचा सामना करावा लागला, तर दोन सामने अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. त्यामुळे शनिवारी झालेल्या लढतीत त्यांच्यावर प्रचंड दडपण होते. त्याचा फायदा घेत लिव्हरपूलने पहिल्या सत्रात आघाडी घेतली. ४३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये यशस्वी रूपांतर करून जेम्स मिलनरने लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रातही सावध खेळ करत त्यांनी बराच काळ आघाडी कायम राखण्यात यश मिळवले, परंतु ७३व्या मिनिटाला टॉटनहॅमने त्यांचा बचाव भेदत सामना १-१ असा बरोबरीत आणला. व्हाईट हार्ट लेनवर खेळलेल्या चार लढतीत लिव्हरपूल अपराजित राहिला आहे.