राजकीय आणि क्रिकेटचा वारसा लाभलेले मैदान म्हणजे शिवाजी पार्क. या मैदानात जशा सभा गाजतात, तसे क्रिकेटचे सामनेही. पण खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या बाबतीत या मैदानात बोंबच आहे. त्यामुळेच या मैदानातील काही बाजूंकडून नेहमीच ‘दरवळ’ असतो तो याच असुविधाकृत दरुगधीचा.
या मैदानात एका वेळी किमान दहा सामने तरी होत असतात. या मैदानात फक्त क्रिकेटच नाही तर अन्य खेळांचाही मोठा पसारा आहे. एवढय़ा लोकांच्या उपस्थितीचा विचार करता, त्यांच्यासाठी तेथे किमान सुविधा असणे तरी आवश्यक होते. परंतु या संपूर्ण मैदानात कोणालाही वापरता येतील अशी दोनच स्वच्छतागृहे आहेत. एक बंगाल क्लबच्या बाजूला पालिकेने बांधलेले आणि दुसरे शिवाजी पार्क जिमखान्याने लोकांसाठी खुले केलेले. पण ही दोन्ही ठिकाणे एवढी दूरवर आहेत की तेथे जावून येण्यातच पंधरा-वीस मिनिटे मोडतात.
या मैदानातील यंग महाराष्ट्र क्लबला स्वच्छतागृहासाठी परवानगी देण्यात आली होती, पण त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला नसल्याचे स्थानिक क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. हे मैदानदेखील ऐतिहासिक वारसा असल्याने तेथे पक्के बांधकाम करता येत नाही, असे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. या परिस्थितीत तेथे फिरते स्वच्छतागृह ठेवता आले असते. परंतु त्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच मैदानात शिरल्यावर काही बाजूंना दरुगधी येते. महिलांच्या ड्रेसिंगरूमची समस्याही बिकट आहे. या ठिकाणचे दोन क्लब्ज महिलांची योग्य व्यवस्था राखतात, मात्र अन्य ठिकाणी त्यांच्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नाही.
असुविधा
मैदानाच्या बाजूला फक्त दोन ठिकाणी स्वच्छतागृह. तेही गैरसौयीचे. ड्रेसिंग रूमची व्यवस्था नाही. दोन क्लब्जकडे पूर्ण व्यवस्था असून तेथे सामने नसल्यास गैरसोय.
ल्ल दिवसाचे सरासरी सामने : १० ल्ल सरासरी उपस्थिती : किमान ७०० व्यक्ती
शिवाजी पार्क हे एवढे मोठे मैदान आहे की जिथे एका वेळेला किती सामने होतात हे सांगणे कठीण. पण या खेळाडूंना गैरसोयींचाच सामना करावा लागतो. बंगाल क्लब आणि शिवाजी पार्क जिमखाना सोडल्यास कुठेही स्वच्छतागृहाची सुविधा नाही. ही दोन्ही ठिकाणे एवढय़ा लांबवर आहेत की तिथे जाऊन येईपर्यंत ५-६ षटकांचा सामना सहज बुडतो. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी कोणत्याही खास सुविधा मैदानात नाहीत. त्यांच्यासाठी खास ड्रेसिंगरूम कुठेच नाहीत. पालिकेला फिरत्या शौचालयाचा वापर करता येऊ शकतो, पण तेही अजून झालेले नाही.
– संगम लाड, क्रिकेट प्रशिक्षक

शिवाजी पार्कवर महिलांचे जास्त सामने होतात, पण बंगाल क्लब आणि शिवाजी पार्क जिमखाना सोडल्यास अन्य ठिकाणी महिलांसाठी कुठलीही सुविधा नाही. महिलांसाठी ड्रेसिंग रूम नसल्याने मोठी गैरसोय होते. त्यामुळे  सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर बराच खोळंबा होतो. त्याचबरोबर शौचालयांचीही जास्त सोय नाही. त्यामुळे काही वेळेला या कारणास्तव सामन्यातील काही भाग बुडतो.
– कल्पना मुरकर, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
           
शिवाजी पार्कवर मोठय़ा संख्येने सामने होत असले तरी ती जागा ऐतिहासिक वास्तूंच्या यादीमध्ये असल्याने आम्ही पक्के बांधकाम करू शकत नाही. पालिकेकडून एक शौचालय बांधण्यात आले आहे. तिथे जास्त गरज असल्याचे आमच्यापर्यंत कुणी पोहोचवले नाही. गरज असल्यास आम्ही फिरत्या शौचालयांचा वापर करू शकतो, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर महिलांना ड्रेसिंगरूम नसेल तर त्यांच्यासाठी महापालिकेचा जिमखाना खुला करू शकतो.
– शरद उघडे, जी-उत्तर वॉर्ड अधिकारी