स्वप्निल गुगळे व चिराग खुराणा यांनी शतकांबरोबर रचलेल्या द्विशतकी भागीदारी यामुळे रणजी क्रिकेट स्पर्धेतील तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राचे आव्हान कायम राहिले. पहिल्या डावात आघाडी मिळविण्यासाठी महाराष्ट्राला १५६ धावांची आवश्यकता असून अजून त्यांचे पाच बळी शिल्लक आहेत.
ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने १ बाद १०१ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. गुगळे व खुराणा या दोघांनीही या मोसमातील दुसरे शतक टोलविले. त्यांनी दुसऱ्या विकटेसाठी ७८ षटकांत २७० धावांची खणखणीत भागीदारी केली. दिवसअखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात ११८ षटकांमध्ये ५ बाद ३९४ धावा केल्या. तामिळनाडूने पहिल्या डावात ५४९ धावा केल्या आहेत.
गुगळे व खुराणा यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या डावाला पुढे सुरुवात केली. त्यांनी लक्ष्मीपती बालाजी या अनुभवी गोलंदाजासह तामिळनाडूच्या सर्वच गोलंदाजांना आत्मविश्वासाने तोंड दिले. त्यांनी संघाच्या २५० धावांचा टप्पाही सहज ओलांडला. गुगळे याला बाबा अपराजितने बाद करीत ही जोडी फोडली. गुगळे याने २८२ चेंडूंमध्ये १५४ धावा करताना २८ वेळा चेंडू सीमापार केला. त्याने या मोसमात दिल्लीविरुद्ध शतक टोलवीत रणजीतील स्वत:चे पहिले शतक केले होते. तो बाद झाल्यानंतर महाराष्ट्राने राहुल त्रिपाठी व खुराणा यांच्याही विकेट्स गमावल्या. त्रिपाठी याला केवळ दोन धावा करता आल्या. खुराणा याने २४१ चेंडूंमध्ये १३ चौकारांसह १२५ धावा केल्या.
खुराणा बाद झाल्यानंतर आलेल्या केदार जाधवकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. त्याने सहा चौकार मारून दमदार सुरुवात केली होती. मात्र एम. रंगराजनने त्याला २६ धावांवर बाद करीत महाराष्ट्राला आणखी एक धक्का  दिला. या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अंकित बावणेने नाबाद ४७ धावा करताना नऊ चौकार ठोकले. खेळ संपला त्या वेळी कर्णधार रोहित मोटवानी हा चार धावांवर खेळत होता. याच जोडीवर महाराष्ट्राच्या आशा आहेत.
संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू : पहिला डाव ५४९ विरुद्ध महाराष्ट्र : पहिला डाव ११८ षटकांत ५ बाद ३९४ (स्वप्निल गुगळे १५४, चिराग खुराणा १२५, अंकित बावणे खेळत आहे ४७,; अश्विन क्रिस्ट २/८०).