मोहम्मद हफीझच्या मॅरेथॉन द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मजबूत आघाडी घेतली. १ बाद २२७ वरून पुढे खेळणाऱ्या पाकिस्तानने तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ५३७ अशी मजल मारली.
बुधवारी शतक पूर्ण करणाऱ्या हफीझने त्याच लयीत पुढे खेळायला सुरुवात केली. शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत त्याने दीडशे धावा पूर्ण केल्या. शतकाकडे कूच करणाऱ्या अझर अलीला शुवगता होमने त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. हफीझ-अली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २२७ धावांची मोठी भागीदारी केली. अलीने ८३ धावांची खेळी केली. युनिस खानने मोठय़ा खेळीच्या उद्देशाने खेळायला सुरुवात केली, मात्र ताजिऊल इस्लामच्या वळलेल्या चेंडूवर युनिस चकला. त्याने ३३ धावा केल्या.
युनिस बाद झाल्यावर हफीझने मिसबाह उल हकच्या साथीने धावफलक हलता ठेवला. ताजिऊल इस्लामच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत हफीझने कारकिर्दीतील पहिलेवहिले द्विशतक झळकावले. द्विशतकानंतर हफीझची गती मंदावली परंतु मिसबाहने एकेरी-दुहेरी धावांबरोबर चौकारांची सांगड घालत पाकिस्तानला दमदार आघाडीची पायाभरणी केली. शुवगता होमच्या गोलंदाजीवर हफीझचा स्विपचा प्रयत्न फसला. त्याने २३ चौकार आणि ३ षटकारांसह २२४ धावांची खेळी साकारली. हफीझ बाद झाल्यावर मिसबाहने सूत्रे हातात घेतली. मात्र अर्धशतकानंतर ताजिऊल इस्लामने मिसबाहला रुबेल होसेनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. मिसबाहने ५९ धावा केल्या. यानंतर असाद शफीक आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज सर्फराझ अहमद जोडीने सहाव्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शफीक आणि सर्फराझ दोघेही ५१ धावांवर खेळत आहेत. पाकिस्तानकडे २०५ धावांची आघाडी आहे. बांगलादेशतर्फे ताजिऊल इस्लामने सर्वाधिक ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश (पहिला डाव) : १२० षटकांत सर्वबाद ३३२ (मोमिनुल हक ८०, इम्रूल केयस ५१, महमदुल्ला ४९, वहाब रियाझ ३/५५, यासिर शाह ३/८६) विरुद्ध पाकिस्तान : १४८ षटकांत ५ बाद ५३७ (मोहम्मद हफीझ २२४, अझर अली ८३, मिसबाह उल हक ५९, ताजिऊल इस्लाम ३/११६)