भारताचा मल्ल नरसिंग यादवच्या उत्तेजक सेवनप्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून उठलेले वादळ आता संपुष्टात आले आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या(नाडा) शिस्तपालन समितीने नरसिंग यादवला निर्दोष जाहीर केले आहे. उत्तेजक सेवनप्रकरणात नरसिंग यादवचा काहीच दोष नसल्याचा निर्वाळा ‘नाडा’ने दिला आहे. नरसिंग सेवन करत असलेल्या ड्रींक्समध्ये भेसळ करण्यात आली होती, असे ‘नाडा’ने आज दिलेल्या निर्णयात जाहीर केले. ‘नाडा’च्या निर्णयामुळे नरसिंगवरील ऑलिम्पिक समावेशाबाबतचे सावट आता दूर होण्याची शक्यता आहे.

नरसिंग यादवच्या डोपिंगप्रकरणी शनिवारी नाडाच्या शिस्तपालन समितीपुढे तब्बल आठ तास चर्चा झाली होती. त्यानंतर याप्रकरणाचा अंतिम निर्णय सोमवारी जाहीर करणार असल्याचे नाडाने स्पष्ट केले होते. नरसिंगची दोन वेळा उत्तेजक चाचणी घेण्यात आली आणि दोन्ही वेळा तो दोषी आढळला. पण माझ्याबाबत हा कट रचल्याचे नरसिंगने सांगितले होते. अखेर नरसिंगची बाजू खरी ठरली असून, ‘नाडा’ने नरसिंगची निर्दोष मुक्तता केली आहे.

नरसिंग यादवबाबतचा नाडाच्या शिस्तपालन समितीचा निर्णय गुरुवारी येणे अपेक्षित होते. पण ‘नाडा’च्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यावर शिस्तपालन समितीकडून निकाल लांबणीवर ढकलला गेला. बुधवारी नरसिंगच्या वकिलांनी ६०० पानांचे प्रतिक्षापत्र सादर करत आपली बाजू मांडली होती. ऑलिम्पिक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे हा निर्णय गुरुवारी होईल, असे वाटले होते. पण शिस्तपालन समितीने या निकालासाठी काही दिवसांचा अवधी मागितला. अखेर आज नरसिंगबाबतचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.