राज्यातील क्रीडा विकासासाठी नवे धोरण तयार केले जाणार असून भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे एक क्षेत्रीय केंद्र राज्यातही सुरू केले जाणार असल्याची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.
मुलुंड (प.) येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर करार करण्यात आला, हे खरे आहे काय? सदर क्रीडा संकुलासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निधीतून २० लाख रुपये दिले आहेत, यात तथ्य आहे काय? आजपर्यंत सदर क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येणार आहे तसेच सदर क्रीडा संकुल उभारण्यासाठी किती कालावधी अपेक्षित आहे, नसल्यास विलंबाची कारणे कोणती, असा प्रश्न सरदार तारासिंह यांनी विचारला होता. हे खरे नाही. सदर ठिकाणी क्रीडा संकुल उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यात येत आहेत. अंदाजपत्रक व आराखडा प्राप्त झाल्यानंतर राज्य क्रीडा विकास  समितीची मान्यता प्राप्त करून घेऊन निधी उपलब्ध करण्याची कार्यवही करण्यात येईल, असे लेखी उत्तर क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.
राधाकृष्ण विखे पाटील, सदा सरवणकर व इतर सदस्यांनी यावर उपप्रश्न विचारले. अशा क्रीडा संकुलासाठी पूर्वी २५ लाख रुपये निधी दिला जायचा. आता एक कोटी रुपये निधी दिला जात आहे. खेळासाठी प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. एकाच खेळाऐवजी आणखी खेळ व प्रशिक्षण देण्यासाठी तसेच क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी संस्था पुढे येत असेल तर त्यासाठी त्यांना क्रीडा संकुल चालवायला देण्याचा शासनाचा विचार आहे. अशांना प्रोत्साहनपर योजना तयार करण्याचाही विचार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे एक क्षेत्रीय केंद्र राज्यात सुरू केले जाणार आहे. राज्यात विविध तज्ज्ञांच्या विचाराने र्सवकष क्रीडा धोरण नव्याने तयार केले जाणार आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.