क्रिकेट म्हणजे धावांची फॅक्टरी आणि गोलंदाजांची कत्तल, असे समीकरण रूढ झाले होते. प्रेक्षकांना फटकेबाजी पाहायला आवडते हे व्यावसायिक गणित समोर ठेवून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजधार्जिणे असे नियमात बदल केले. मात्र यामुळे चुरस वाढण्याऐवजी प्रचंड धावसंख्येच्या एकतर्फी सामन्यांची संख्या वाढली. गोलंदाजीला आलेले केविलवाणे स्वरूप टाळण्यासाठी आयसीसीने आता नियमात बदल केले असून, यामुळे एकदिवसीय क्रिकेट संतुलित होण्यास मदत होणार आहे.
नवीन नियम ५ जुलैपासून अमलात येणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपल्या शिफारशी आयसीसी बोर्डासमोर सादर केल्या. बार्बाडोस येथे सुरू असलेल्या संघटनेच्या वार्षिक बैठकीत नियमांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
‘खेळ गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही समान संधी देणारा असावा या विचारातून बदल करण्यात आले आहेत’, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले.
असे असतील नियम
’पहिल्या दहा षटकांत यष्टीनजीकच्या भागात दोन क्षेत्ररक्षक तैनात करण्याचा नियम रद्द
’१५ ते ४० षटकांदरम्यानचा बॅटिंग पॉवरप्ले रद्द
’ ४१ ते ५० षटकांदरम्यान ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर ५ क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा
’ सर्व प्रकारच्या नोबॉलनंतर पुढच्या चेंडूवर फ्री हिट