विश्वचषकात गोल करणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. विश्वचषकातला प्रत्येक गोल हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा चिरंतर ठेवा असतो. त्या गोलने मिळवलेला विजय हा खेळाडू आणि संघासाठी लाखमोलाचा असतो. संघाच्या हितासाठी काहीही करायला सज्ज असलेल्या खेळाडूकडून अजाणतेपणी कधी अशी घोडचूक होऊन जाते की त्यामुळे संघाचा घात होऊ शकतो. अशी फुटबॉलमधली गोष्ट म्हणजे स्वयंगोल. याला आत्मघात असे दुसरे नावही देता येईल. काही वेळा बचाव करताना, प्रतिस्पध्र्याचा चेंडू दूर मारण्याच्या नादामध्ये अशी चूक होते आणि त्याच्यासहित संघालाही त्याची मोठी किंमत मोजावी लागते, अगदी प्राणावरही ते बेतते. आंद्रेस एस्कोबार हे त्याचे ज्वलंत उदाहरण. अमेरिकेत झालेल्या १९९४च्या विश्वचषकामध्ये कोलंबियाच्या इस्कोबारने ३५व्या मिनिटाला यजमानांबरोबरच्या सामन्यात स्वयंगोल केला. या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यावर इस्कोबार मायदेशी परतला आणि त्यानंतर पाचव्याच दिवशी त्याच्यावर माथेफिरूंनी केलेल्या हल्ल्यात त्याला प्राण गमवावे लागले. यंदाच्या विश्वचषकाची सुरुवातच स्वंयगोलने झाली आणि नंतर ही स्वयंगोलांची आकडेवारी पाचपर्यंत लांबली. आता सर्वाधिक स्वयंगोलच्या व्रिकमाची बरोबरी होते की तो मोडित निघतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
उरुग्वेमध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकापासून ते आतापर्यंत एकंदर ४१ स्वयंगोल झाले आहेत. पहिल्या विश्वचषकात मेक्सिकोच्या मॅन्युएल रोसासच्या नावावर पहिला स्वयंगोल नोंदवला गेला. फ्रान्समध्ये झालेल्या १९९८ सालच्या विश्वचषकात सर्वाधिक सहा स्वयंगोल नोंदवले गेले. यामध्ये पहिला स्वयंगोल स्कॉटलंडच्या टॉम बॉयडने केला, तर दुसरा मोराक्कोच्या युसेफ चिप्पोने, तिसरा दक्षिण आफ्रिकेच्या पीइरे इस्साने, चौथा स्पेनच्या अँडोनी झुबीझारेंटाने, पाचवा युगोस्लाव्हियाच्या सिनिसा माझलोव्हिकने आणि सहावा बल्गेरियाच्या गिओर्गी बाचेव्हने.
यंदाच्या विश्वचषकाची सुरुवातच ब्राझीलच्या मार्सेलोने केलेल्या स्वयंगोलमुळे झाली. क्रोएशियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मार्सेलोने ११व्या मिनिटालाच पहिला स्वयंगोल केला. त्यानंतर दुसरा स्वयंगोल होंडारूसच्या नोएल व्हालाडारेसने फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात केला. यंदाच्या विश्वचषकातील तिसरा गोल हा आतापर्यंतचा सर्वात जलद स्वयंगोल म्हणून नोंदवला गेला आहे. बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिनाच्या सीड कोलासीनॅकने अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्याच मिनिटाला हा गोल केला. त्यानंतर घानाच्या जॉन बोयेने पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात स्वयंगोल केला. बाद फेरीमध्ये नायजेरियाच्या जोसेफ योबेने फ्रान्सविरुद्ध स्वयंगोल केला.
आतापर्यंत स्पेन, मेक्सिको आणि बल्गेरिया या देशांनी सर्वाधिक प्रत्येकी तीन स्वयंगोल केले आहेत, तर बल्गेरियाने १९६६च्या विश्वचषकात दोन स्वयंगोल केले होते. एका सामन्यात दोन स्वयंगोल झाल्याची घटनाही घडली आहे. २००२च्या विश्वचषकातील पोर्तुगाल आणि अमेरिका यांच्यातील सामन्यामध्ये दोन स्वयंगोल झाले. पोर्तुगालच्या जॉर्ज कोस्टा आणि अमेरिकेच्या जेफ अगुस यांनी या सामन्यामध्ये स्वयंगोल केले. एकाच खेळाडूने एकाच सामन्यात एक गोल आणि एक स्वयंगोल केल्याची घटनाही घडलेली आहे. १९७८ साली नेदरलँड्सच्या इर्नि ब्रँडट्सने पहिल्यांदा १८व्या मिनिटाला स्वयंगोल केला आणि त्यानंतर गोल करत आपली चूक सुधारली. हा सामना नेदरलँड्सने २-१ असा जिंकला.
देशासाठी विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. चार वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभामध्ये आपल्याकडूनही देशासाठी गोल व्हावा, आपल्या गोलमुळे देश जिंकावा, असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे कोणताही खेळाडू असे कृत्य जाणूनबुजून करत नाही, ती एक चूक असते आणि खेळभावनेने त्या चुकीला क्षमा असायला हवी. चुका या अजाणतेपणीच होत असतात, जर त्या समजल्या असत्या किंवा रोखता आल्या असत्या तर चुका झाल्याच नसत्या. स्वयंगोल करण्याच्या इराद्याने कोणताही खेळाडू मैदानात उतरत नसतो, कारण त्याला आपल्याकडे कधी चेंडू येईल आणि आपण त्या वेळी कुठे असू हे सांगता येणे कठीण आहे. स्वयंगोल करणाऱ्या खेळाडूला दटावले तर त्याच्या खेळावर विपरीत परिणाम होऊ शकतो, पण जर त्याला या परिस्थितीतून बाहेर काढले तर तो गोलसाठी साहाय्य किंवा गोल करू शकतो. एस्कोबारसारखे प्रकरण हे खेळभावनेला कलंक आहे, कारण खेळ म्हणजे युद्ध नव्हे, याची जाणीव सर्वानीच ठेवायला हवी.