कवानीच्या गोलमुळे तगडय़ा चेल्सीवर २-१ने सरशी
उरुग्वेचा आघाडीपटू एडिंसन कवानीने केलेल्या गोलच्या बळावर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या बाद फेरीतील पहिल्या लीगमध्ये चेल्सीचा २-१ असा पराभव केला. यामुळे चेल्सीला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी परतीच्या सामन्यात पीएसजीवर मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागेल. दुसऱ्या सामन्यात बेन्फीका क्लबने जोनासने भरपाई वेळेत नोंदवलेल्या गोलच्या जोरावर झेनिटवर १-० असा निसटता विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीएसजीने आक्रमक खेळ केला. तिसऱ्याच मिनिटाला लुकासने चेंडू गोलजाळीच्या दिशेने तटवला, परंतु चेल्सीचा गोलरक्षक कोटरेइसने तो अप्रतिमरीत्या अडवला. कोटरेइसच्या अभेद्य भिंतीमुळे पीएसजीला मोठय़ा फरकाने विजय मिळवता आला नाही. झलटान इब्राहिमोव्हिकने ३९ व्या मिनिटाला गोल करून पीएसजीला आघाडी मिळवून दिली, परंतु अवघ्या सहा मिनिटांत चेल्सीकडून जॉन ओबी माइकेलने गोल करून सामना पहिल्या सत्रात १-१ असा बरोबरीत ठेवला.
दुसऱ्या सत्रात ७३ व्या मिनिटाला लुकास डा सिल्व्हाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या कवानीने अवघ्या पाच मिनिटांत गोल खाते उघडले. कवानीच्या या गोलने पीएसजीने २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी अखेपर्यंत कायम राखून पीएसजीने विजय निश्चित केला.
‘‘या पराभवाने आम्हाला वेदना झाली, परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर केलेल्या गोलने आशा दाखवली आहे,’’ अशी प्रतिक्रिया चेल्सीचे प्रशिक्षक गूस हिंड्डीक यांनी दिली.

 : युरोपियन फुटबॉल स्पध्रेत मागील ३८ सामन्यांत पीएसजीला केवळ एकच पराभव पत्करावा लागला. एप्रिल २०१५ मध्ये बार्सिलोनाने ३-१ अशा फरकाने पीएसजीला नमवले होते. त्यानंतर पीएसजीने २४ विजय मिळवले, तर १२ सामने अनिर्णित राखले.