अ‍ॅटलेटिको दी कोलकाताला जबर धक्का

तीन ते चार आठवडे आयएसएलला मुकणार

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) गतविजेत्या अ‍ॅटलेटिको दी कोलकाता संघाला मंगळवारी जबर धक्का बसला. कोलकाताचा प्रमुख खेळाडू आणि पहिल्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार हेल्डर पोस्टिगाला दुखापतीमुळे स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे आणि पुढील तीन ते चार आठवडे त्याला आयएसएलला मुकावे लागणार आहे.

तीन वेळा विश्वचषक स्पध्रेत पोर्तुगीज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोस्टिगाने आयएसएलच्या दुसऱ्या सत्रातील चेन्नईयन एफसी संघाविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळ करून संघाला ३-२ असा विजय मिळवून दिला होता. त्याच सामन्यात ७० व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदविल्यानंतर स्नायू ताणल्यामुळे त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पुढील उपचारासाठी तो मायदेशी परतला.

‘‘एमआरआयच्या अहवालानुसार पोस्टिगाचे स्नायू ताणल्याचे उघडकीस आले. वैयक्तिक डॉक्टरांनी दुखापतीतून लवकर सावरण्यासाठी त्याला मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे आणि पुढील तीन ते चार आठवडे तो आयएसएलमध्ये खेळू शकणार नाही,’’ अशी माहिती कोलकाता संघाच्या अधिकाऱ्याने दिली. मात्र, घरच्या मैदानावर २९ ऑक्टोबरला होणाऱ्या दिल्ली डायनामोस एफसीविरुद्धच्या लढतीत तो खेळेल, अशी माहिती त्यांनी दिली.