बचावपटूंनी अखेरच्या क्षणात केलेल्या चुकांमुळे दबंग दिल्लीने हातातला सामना गमावला आहे. हरियाणा स्टिलर्स संघाने दिल्लीवर २७-२५ अशी मात केली. हरियाणाकडून अबुफजल मग्शदुलू आणि मिराज शेख यांनी चढाईत आपल्या संघाची बाजू लढवत १४ गुणांची कमाई केली.

आजच्या सामन्यात पिछाडी भरुन काढत दिल्लीच्या संघाने दुसऱ्या सत्रात पुनरागमन केलं होतं. मात्र बाजीराव होडगे आणि विराज लांगडे या बचावपटूंनी केलेल्या चुकांमुळे हरियाणाने सामन्यात पुनरागमन केलं. दिल्लीकडून उजवा कोपरारक्षक निलेश शिंदेने आपला फॉर्म कायम राखत बचावात ५ गुणांची कमाई केली. मात्र त्याला इतर खेळाडूंची हवीतशी साथ मिळाली नाही.

दुसरीकडे हरियाणा स्टिलर्स संघाने चढाईत चांगला खेळ केला. दिपक दहीया आणि सुरजीत सिंह यांनी १२ गुण मिळवले. त्याला विकास कंडोलानेही चांगली साथ दिली. आजच्या सामन्यात हरियाणाच्या बचावपटूंना हवीतशी कामगिरी करता आली नाही. मात्र दिल्लीच्या खेळाडूंनी केलेली चुक हरियाणाच्या पथ्थ्यावर पडली आणि सामना हरियाणाच्या संघाने जिंकला.

तर आजच्या दिवसाच्या दुसऱ्या मॅचमध्ये उत्तर प्रदेशच्या संघाला बरोबरीत रोखण्यात तामिळ थलायवाज संघाला यश आलं. हा सामना ३३-३३ अशा बरोबरीत सुटला. अखेरच्या सेकंदापर्यंत या सामन्यात घडामोडी घडत गेल्या. रिशांक देवाडीगाने दहा सेकंदांमध्ये केलेल्या रेडमुळे उत्तर प्रदेशला पुन्हा एकदा हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडावं लागलं. उत्तर प्रदेशकडून आजच्या सामन्यात रिशांक देवाडीगाने एकाकी झुंज दिली. त्याने सामन्यात १४ गुणांची कमाई केली. मात्र त्याला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. याचसोबत उत्तर प्रदेशच्या बचावफळीला आजच्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

तामिळ थलायवाजने आपल्या गेल्या सामन्यांच्या तुलनेत कामगिरीत सुधारणा केली आहे. कर्णधार अजय ठाकूरने चढाईत १० गुण मिळवले. तर बचावफळीत अमित हुडाने ६ गुणांची कमाई केली. मात्र या दोन्ही खेळाडूंना इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. मात्र शेवटच्या काही सेकंदांमध्ये बचावपटूंनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे तामिळ थलायवाजने सामना बरोबरीत सोडवला.