आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली असून, पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये भारतीय संघाच्या दोन गोलंदाजांचा समावेश आहे.

वाचा: भारतीय संघातील पुनरागमनाबाबत गौतम गंभीर म्हणतो…

फिरकीपटू आर.अश्विन कसोटी क्रमवारीत दुसऱया स्थानी आहे, तर रवींद्र जडेजाला सातवे स्थान मिळाले आहे. नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आर.अश्विन १० विकेट्स घेऊन कसोटी विश्वातील आपल्या वैयक्तिक २०० विकेट्सचा टप्पा गाठला. अश्विन सर्वाधिक वेगाने २०० विकेट्सटचा टप्पा गाठणारा गोलंदाज ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर अश्विनने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला क्रमवारीत मागे टाकले. अश्विन ८७१ गुणांनी दुसऱया स्थानावर आहे, तर द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ८७८ गुणांनी अव्वल स्थानावर आहे. यापुढील सामन्यांत आणखी चांगली कामगिरी करून अश्विनला क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे.
दुसरीकडे, रवींद्र जडेजा ७९८ गुणांसह क्रमवारीत सातव्या स्थानी आहे.

BLOG : … मग ‘कसोटी’ शब्द कशाला ठेवायचा?

फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या दहा जणांमध्ये एकाही भारतीय फलंदाजाला स्थान मिळवता आलेले नाही. अजिंक्य रहाणे पहिल्या दहा खेळांडूच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे. रहाणे सध्या ११ व्या स्थानावर आहे, तर कानपूर कसोटीत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला विराट कोहली २० व्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्हन स्मिथ सध्या ९०६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७९ गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.