वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरच्या पाच बळींच्या बळावर ‘अ’ गटातील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत मुंबईने बडोद्यावर १६९ धावांनी शानदार विजयाची नोंद केली. बडोद्याला अखेरच्या दिवशी निर्णायक विजयासाठी ४०८ धावांची आवश्यकता होती, परंतु ७७.३ षटकांत २३८ धावांत त्यांचा दुसरा डाव आटोपला.
२ बाद ६७ धावसंख्येवरून रविवारी बडोद्याने आपल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु नियमित अंतरावर त्यांचे फलंदाज बाद होत केले. शार्दूलने ३९ धावांत ५ बळी घेत यात सिंहाचा वाटा उचलला.
केदार देवधरने बडोद्याकडून सर्वाधिक नाबाद ५८ धावा केल्या, मुनाफ पटेलने ३५ चेंडूंत ५३ धावा केल्या. तर सलामीवीर सौरभ वाकस्कर (४८) आणि दीपक हुडा (३२) यांनी आपल्या फलंदाजीचे योगदान दिले. या सामन्याद्वारे मुंबईने सहा गुणांची कमाई केली असून, त्यांची एकूण गुणसंख्या १७ झाली आहे. अ-गटात सध्या मुंबईच्या संघाने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : २८७ आणि ६७ षटकांत ९ बाद ३०४ डाव घोषित (श्रेयस अय्यर ९०, निखिल पाटील नाबाद ५०; युसूफ पठाण ५/८०)
बडोदा : १८४ आणि ७७.३ षटकांत सर्व बाद २३८ (केदार देवधर नाबाद ५८, मुनाफ पटेल ५३; शार्दूल ठाकूर ५/३९)

महाराष्ट्राची कडवी झुंज
वलसाड : फॉलोऑनची नामुष्की ओढवलेल्या महाराष्ट्राने चौथ्या आणि अंतिम दिवशी अथक झुंज देत गुजरातविरुद्धची रणजी लढत अनिर्णित राखली. गुजरातच्या ४२९ धावांसमोर खेळताना महाराष्ट्राचा पहिला डाव २६२ धावांतच आटोपला होता. दुसऱ्या डावात बिनबाद १३१वरून पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राने ४२९ धावांचा डोंगर उभारत पराभव टाळला. मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळे गुजरातला तीन गुण मिळवता आले.