भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी झालेली निवड आणि त्यानंतर झालेल्या घडामोडी यांचा सुतरामही उल्लेख न करता, आपण गेल्या दोन आठवडय़ांमध्ये अधिक परिपक्व झालो, असे शास्त्री यांनी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी सूचक विधान केले.

‘‘गेल्या वेळी जेव्हा भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता, त्यानंतर या वेळी जाताना मी अधिक परिपक्व झालो आहे. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये ज्या काही घटना घडल्या त्यामुळे मला असे वाटत आहे. काही व्यक्ती येतात आणि जातात, पण भारतीय संघ हा आहे तसाच राहतो,’’ असे शास्त्री म्हणाले.

अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. या वेळी वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मूडी यांना मागे टाकत शास्त्री यांनी प्रशिक्षकपदाची शर्यत जिंकली.

बी. अरुण यांच्याबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले की, ‘‘त्यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहिल्यावर तुम्हालाही काही गोष्टी लक्षात येतील. आयुष्यातील १५ वर्षे अरुण यांनी प्रशिक्षण दिले आहे. भारताच्या १९ वर्षांखालील, ‘अ’ संघाबरोबर त्यांनी काम केले आहे. माझ्यापेक्षा जास्त ते या खेळाडूंना ओळखतात. २०१५च्या विश्वचषकात भारतीय गोलंदाजांनी ८० पैकी ७७ बळी मिळवले होते. जर त्यांच्या नावाला वलय असले असते तर त्यांना आपसूकच गोलंदाजी प्रशिक्षकपद देण्यात आले असते. याहून अधिक मला काही सांगण्याची गरज नाही.’’

शास्त्रींना सल्लागारपदी सचिन हवा होता

भारतीय संघाच्या सल्लागारपदी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हवा होता. ही मागणी शास्त्री यांनी बीसीसीआयच्या विशेष समितीला केली होती, पण परस्पर हितसंबंधांचा मुद्दा येत असल्याने सचिनला ते संघाचे सल्लागारपद देण्यात आले नाही.