विजयच्या अर्धशतकामुळे दुसऱ्या दिवशी भारत सुस्थितीत; अश्विनच्या सहा बळींमुळे इंग्लंडला ४०० धावांत रोखले

भारतीय खेळपट्टय़ांवर रविचंद्रन अश्विनची फिरकी म्हणजे यशाची गुरुकिल्ली. हीच फिरकी वानखेडे स्टेडियमवर पुन्हा प्रभावी ठरली. त्यानंतर अपयश मागे टाकत मुरली विजयने (७०*) दिमाखात अर्धशतकी खेळी साकारली. राजकोटला शतकी खेळी साकारल्यानंतर तो धावांसाठी झगडत होता. त्यामुळेच ‘अश्विन जोरात आणि मुरली सुरात’ अशा शब्दांत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे वर्णन करता येईल. त्यामुळे २५६ धावांनी पिछाडीवर असला तरी भारत सुस्थितीत आहे.

इंग्लंडने पहिल्या दिवशी किटन जेनिंग्सच्या पदार्पणीय शतकाच्या बळावर पावणेतीनशे धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र धावांचा हा ओघ त्यांना दुसऱ्या दिवशी राखता आला नाही. फक्त ११२ धावांत इंग्लंडचा उर्वरित निम्मा संघ गारद झाला. इंग्लंडला सव्वातीनशे धावांत रोखू, असे अश्विनने गुरुवारी आत्मविश्वासाने सांगितले होते. पण त्याच्या आशा फोल ठरल्या. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत जोस बटलरने (७६) झुंजार खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला चारशे धावांपर्यंत पोहोचता आले. इंग्लंडने वानखेडेवरील सलग तिसऱ्या कसोटीत चारशे धावांचा टप्पा ओलांडून भारतावरील दडपण वाढवले आहे. याआधी २००६मध्ये ४०० आणि २०१२मध्ये ४१३ धावा उभारल्यानंतर ते दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले होते. मात्र दुसऱ्या दिवसाचे विश्लेषण करताना भारताचा पार्थिव पटेल म्हणाला की, ‘‘इंग्लंडला चारशे धावांवर रोखल्यानंतर आम्ही दीडशे धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय संघ या कसोटीत सुस्थितीत आहे.’’

अश्विन-जडेजाचा प्रभाव

भारताकडून अश्विनने ११२ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली. मात्र शुक्रवारी तीन बळी घेणाऱ्या रवींद्र जडेजाने (१०९ धावांत ४ बळी) त्याला अप्रतिम साथ दिली. अश्विन आपल्या कसोटी कारकीर्दीतील चौथा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळत आहे. २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत त्याने एकंदर ९ बळी आणि पहिलेवहिले शतक झळकावले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक साकारले होते. सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी सामन्यातही अश्विनने ७ बळी घेतले. त्यामुळे अश्विन आपल्या अनुकूल मैदानावर आणखी कोणते कर्तृत्व दाखवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले.

मुरली-चेतेश्वरची शतकी भागीदारी

उत्तरार्धातील खेळात छाप पाडली ती तामिळनाडूचा उमदा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने. मागील अनेक कसोटी सामन्यांत सलामीचा जोडीदार बदलत असतानाही विजयचे स्थान मात्र भक्कम आहे. इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत मुरलीने १२६ धावांची दिमाखदार खेळी झळकावली होती. मात्र त्यानंतरच्या पाच डावांत तो अपयशी ठरला. परंतु मुंबईत त्याचा बहरलेला खेळ क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाला. साडेतीन तास खेळपट्टीवर पाय रोवणाऱ्या मुरलीने ६ चौकारांसह मोईन अली आणि आदिल रशिदला सुरेख षटकारसुद्धा खेचले. अलीला चौकार ठोकत मुरलीने अर्धशतक पूर्ण केले. चेतेश्वर पुजाराची (४७*) त्याला तोलामोलाची साथ मिळाली. त्यामुळेच इंग्लंडने पहिल्या डावात १ बाद १४६ अशी मजल मारली. मुरली-चेतेश्वर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. हे दोघेही भारतीय फलंदाजीचे कसोटीमधील प्रमुख आधारस्तंभ. शनिवारी तिसऱ्या दिवशी त्यांच्या धडाकेबाज खेळी पाहायला मिळतात की, इंग्लिश गोलंदाजांचे वर्चस्व, यावरच कसोटीचे भवितव्य ठरणार आहे.

धावफलक

  • इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक यष्टिचीत पटेल गो. जडेजा ४६, किटन जेनिंग्स झे. पुजारा गो. अश्विन ११२, जो रूट झे. कोहली गो. अश्विन २१, मोईन अली झे. नायर गो. अश्विन ५०, जॉनी बेअरस्टो झे. उमेश यादव गो. अश्विन १४, बेन स्टोक्स झे. कोहली गो. अश्विन ३१, जोस बटलर त्रि. गो. जडेजा ७६, ख्रिस वोक्स झे. पटेल, गो. जडेजा ११, आदिल रशीद त्रि. गो. जडेजा ४, जेक बॉल झे. पटेल गो. अश्विन ३१, जेम्स अँडरसन नाबाद ०, अवांतर ४ (लेगबाइज २, नोबॉल १, बाइज १), एकूण १३०.१ षटकांत सर्व बाद ४००
  • बाद क्रम : १-९९, २-१३६, ३-२३०, ४-२३०, ५-२४९, ६-२९७, ७-३२०, ८-३३४, ९-३८८, १०-४००
  • गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १३-०-४९-०, उमेश यादव ११-२-३८-०, रविचंद्रन अश्विन ४४-४-११२-६, जयंत यादव २५-३-८९-०, रवींद्र जडेजा ३७.१-५-१०९-४
  • भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल त्रि. गो. अली २४, मुरली विजय खेळत आहे ७०, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ४७, अवांतर ५ (बाइज १, लेगबाइज ४), एकूण ५२ षटकांत १ बाद १४६
  • बाद क्रम : १-३९
  • गोलंदाजी : जेम्स अँडरसन ८-४-२२-०, ख्रिस वोक्स ५-२-१५-०, मोईन अली १५-२-४४-१, आदिल रशिद १३-१-४९-०, जेक बॉल ४-२-४-०, बेन स्टोक्स ४-२-४-०, जो रूट ३-१-३-०

 

स्वत:चा मार्ग स्वत:च शोधायचा असतो

मुंबई : ‘‘गेल्या सामन्यात मला पुनरागमनाची संधी मिळाली आणि या सामन्यात चांगली फलंदाजी झाली. यासाठी मी जेव्हा संघाबाहेर होतो, तो कालावधी फार महत्त्वाचा वाटतो. कारण या कालावधीमध्ये मला स्वत:च्या बलस्थान आणि कच्च्या दुव्यांवर मेहनत घेता आली. संघात स्थान मिळवण्याचा मार्ग आपण स्वत:च शोधायचा असतो. कारण गेल्या वर्षभरामध्ये मला संघातील स्थान टिकवता आलेले नाही. पण यापुढे सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावर माझा भर असेल,’’ असे इंग्लंडच्या जोस बटलरने संघातील पुनरागमनाबाबत मत व्यक्त केले.

पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यानंतर बटलरला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर थेट भारताविरुद्धच्या मोहालीमधील सामन्यात त्याला स्थान देण्यात आले.

वानखेडेच्या खेळपट्टीबद्दल बटलर म्हणाला की, ‘‘ही खेळपट्टी अजूनही फलंदाजांसाठी पोषक आहे. चेंडू वळत असले तरी ते बॅटवर सहजपणे येत आहेत. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करता येऊ शकेल.’’

 

डीआरएस मागण्याचा कालावधी फारच कमी-पार्थिव पटेल

मुंबई : मैदानावर सर्वात चांगला खेळ पाहता येत असेल तर तो यष्टीरक्षकाला. चेंडूचा टप्पा, तो कुठे लागला किंवा चेंडू कुठे जात होता, हे सर्वात चांगले यष्टीरक्षकाला कळत असते. त्यामुळे सध्याच्या घडीला पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याच्या प्रणालीमुळे (डीआरएस) यष्टीरक्षकाचे महत्त्व अधिक वाढले आहे. ‘डीआरएस’मध्ये झालेले बदल चांगले वाटत असले तरी त्यासाठीचा कालावधी फारच कमी आहे, असे मत भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने व्यक्त केले आहे.

‘‘पंचांनी एखादा निर्णय दिल्यावर १५ सेकंदांमध्ये त्याविरोधात दाद मागता येते. या कालावधीमध्ये ‘डीआरएस’ घ्यायचा की नाही, हे ठरवणे अवघड होऊन बसते. त्यामुळे कधी कधी घाईत निर्णय घेतला जातो,’’ असे पार्थिव म्हणाला.

फिरकीपटूचा अप्रतिम मारा

‘‘आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव या तिघांनीही आतापर्यंत अप्रतिम मारा केला आहे. मोहालीच्या सामन्यात चेंडू वळत नव्हते. त्या वेळी या तिघांनीही अप्रतिम मारा केला होता. लाल मातीच्या खेळपट्टीवर धावा रोखणे सोपे नसते. पण वानखेडेवर पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात या तिघांनी इंग्लंडच्या धावसंख्येवर अंकुश लावला आणि त्यामुळेच तिसऱ्या सत्रात आम्ही बळी मिळवण्यात यशस्वी ठरलो,’’ असे पार्थिवने सांगितले.