दुसऱ्या लढतीत बार्सिलोनावर २-० असा विजय

अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक समजल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्याशिवायही आम्ही जिंकू शकतो, हे रिअल माद्रिदने बार्सिलोनाविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत दाखवून दिले. पहिल्या लढतीत माद्रिदने बार्सिलोनावर ३-१ असा विजय मिळवला होता, तर दुसऱ्या लढतीत २-० असा विजय मिळवत एकूण ५-१ अशा फरकासह माद्रिदने स्पॅनिश सुपर चषकाला गवसणी घातली. प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी माद्रिदला पुन्हा एकदा जेतेपद जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. गेल्या २० महिन्यांमध्ये माद्रिदचे हे सातवे जेतेपद ठरले आहे.

बार्सिलोनाच्या पहिल्या लढतीत रोनाल्डोला पंचांनी दोनदा पिवळे कार्ड दाखवले होते, त्यावर नाराज झालेल्या रोनाल्डोने पंचांना धक्का दिला होता. या प्रकरणी रोनाल्डोवर पाच सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बार्सिलोनाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोनाल्डोला खेळता आले नव्हते.

या पराभवाने बार्सिलोनावर नामुष्की आली. कारण लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेझसारखे दिग्गज खेळाडू संघात असताना बार्सिलोनाला माद्रिदशी कडवी झुंज देता आली नाही. दुसऱ्या लढतीत माद्रिदच्या मार्को असेन्सियो आणि करिम बेन्झेमा यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. माद्रिदकडून पहिला गोल करणाऱ्या मार्कोने या वेळी दुसऱ्या गोलमध्ये महत्त्वाची भूमिका वठवली. दुसऱ्या सत्रामध्ये बार्सिलोनाने जोरदार आक्रमण केले, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही.

आम्ही या सामन्यात फार सुरेख खेळ केला. पहिल्या सत्रात तर आमच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या संघाला यशाची भूक आहे आणि ती न संपणारी आहे. यापुढे कामगिरीत सातत्य राखण्यावर आमचा भर असेल.   झिनेदिन झिदान, रिअल माद्रिदचे प्रशिक्षक