अश्विनी पोनप्पाने प्रणव चोप्राच्या बरोबरीने खेळताना तर पुरुष एकेरीत आरएमव्ही गुरुसाईदत्तने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत आगेकूच केली. मिश्र दुहेरीत नव्या सहकाऱ्यासह खेळण्याचा अश्विनीचा निर्णय अचूक ठरला. 

पहिल्या लढतीत अश्विनी-प्रणव जोडीने ऑस्ट्रेलियाच्या चाम चेन आणि सुसान वांग जोडीवर २१-१४, २१-६ असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात या जोडीने जर्मनीच्या मार्क लॅम्सफुस आणि इसाबेल हेट्रिच जोडीवर २१-१९, २१-१७ अशी मात केली. उंचपुऱ्या प्रणवने तडाखेबंद स्मॅशेचा प्रभावीपणे उपयोग केला तर अश्विनीने नेटजवळून सुरेख खेळ करत दोन्ही लढतीत वर्चस्व गाजवले. मुख्य फेरीत अश्विनी – प्रणव जोडीसमोर कोरियाच्या चोई सोल्ग्यू आणि इओम हाय वोन जोडीचे आव्हन आहे.
एकेरीच्या पहिल्या लढतीत गुरुसाईदत्तने मलेशियाच्या एई वेई जिआनचा २१-१३, २१-९ असा पराभव केला. राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या गुरूने लौकिकाला साजेसा खेळ करत सहज विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत जपानच्या काझुमासा साकाईवर २१-१५, २१-५ अशी मात करत मुख्य फेरीत धडक मारली. पात्रता फेरीचा अडथळा सहजपणे पार करणाऱ्या गुरुसाईदत्तसमोर मुख्य फेरीच्या पहिल्याच लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चेन लाँगचे आव्हान आहे.
बुधवारी द्वितीय मानांकित सायना नेहवालची लढत मलेशियाच्या चीआ ल्याडिआ यि यु हिच्याशी होणार आहे. पी.व्ही.सिंधूचा सलामीचा मुकाबला चीनच्या वांग यिहानशी होणार आहे. पारुपल्ली कश्यप आणि चीनचा वांग झेनमिंग आमनेसामने असणार आहेत. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीची सलामीची लढत नेदरलँड्सच्या समंथा बार्निग आणि आयरिस टेबलिंग जोडीशी होणार आहे. किदम्बी श्रीकांतसमोर डेन्मार्कच्या हान्स क्रिस्तियन विथिनघुस यांच्यात मुकाबला रंगणार आहे.