मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जीवनपट आज बॉक्स ऑफीसवर दाखल झाला. आपल्या लाडक्या खेळाडूचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि अपेक्षेप्रमाणे ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सचिनचं क्रिकेट लाईफ आजवर प्रत्येकानं पाहिलं आहे, पण या चित्रपटाच्या माध्यमातून सचिनच्या चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेता येणार आहेत. पत्नी अंजलीने आजवर दिलेली साथ आणि पाठिंबा याचा वेळोवेळी सचिनने उल्लेख केला आहे. गुरूवारी सचिन आणि अंजली यांच्या लग्नाला २२ वर्ष पूर्ण झाली आणि आज सचिनचा चित्रपट देखील प्रदर्शित झाला.

 

सचिन आणि अंजली १९९५ साली लग्न बंधनात अडकले. पुढे सारा आणि अर्जुन या दोन मुलांच्या सोबतीने संसार बहरत गेला. करिअरच्या शेवटच्या काळात पत्नी अंजली पाठिशी उभी राहिल्याचंही सचिनने म्हटलं होतं. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारताना आपल्या निरोपाच्या भाषणात सचिनने आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम ‘पार्टनरशिप’मध्ये अंजलीचा उल्लेख केला होता. अंजलीसोबतची ‘पार्टनरशिप’ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ‘पार्टनरशिप’ असल्याचं सचिनने म्हटलं होतं.