सिंधूचे आव्हान संपुष्टात; श्रीकांत, समीर वर्माची आगेकूच
भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी विजयी आगेकूच केली. मात्र पी.व्ही. सिंधूला सलामीच्या लढतीतच अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
सातव्या मानांकित सायनाने २०१४मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सायना उत्सुक आहे. सलामीच्या लढतीत तिने ऑस्ट्रेलियाच्या जॉय लाइवर २१-१०, २१-१४ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत मलेशियाच्या जिन वेई गोहशी सायनाची लढत होणार आहे.
कोरियाच्या किम ह्य़ो मिनने सिंधूवर २१-१५, २१-१९ अशी मात केली. रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर सरावाच्या दृष्टीने सिंधूसह भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. मात्र सलामीच्या लढतीत पराभूत झाल्याने सिंधूने सरावाची संधी गमावली आहे.
मुंबईकर तन्वी लाडने संघर्षमय लढतीत ऑस्ट्रेलियाच्या तिफानी होवर १८-२१, २१-१४, २१-११ अशी मात केली. देशांतर्गत स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीच्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तन्वीसाठी ही स्पर्धा कौशल्य सिद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. पुरुषांमध्ये समीर वर्माने इंडोनेशियाच्या इहसान मौलाना मुस्तोफाला २२-२०, १५-२१, २१-१५ असे नमवले.
हाँगकाँगच्या ह्य़ू युनने आरएमव्ही गुरुसाईदत्तचा २१-१९, १२-२१, २१-१५ असा पराभव केला. किदम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या एनजी का लाँग अ‍ॅग्नसवर २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला.
मलेशियाच्या व्ही शेम गोह आणि वी किआँग तान जोडीने निखार गर्ग आणि एम. अनिलकुमार राजू जोडीवर २१-१२, २१-१० अशी मात केली.