भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला १४ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या डेन्मार्क खुल्या सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेसाठी महिला एकेरी गटात सातवे मानांकन देण्यात आले आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हैदराबादच्या सायनाने २०१२मध्ये डेन्मार्कमधील या प्रतिष्ठेच्या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले होते. सहा लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या या स्पध्रेत यंदा फक्त सायनाला मानांकन लाभले आहे. पी. व्ही. सिंधूला मानांकन मिळालेले नाही.
ओडेन्स स्पोर्ट्स पार्कवर होणाऱ्या या स्पध्रेत पुरुष एकेरीमध्ये भारताची मदार के. श्रीकांत आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपवर असेल. श्रीकांतला पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील ली च्योंग वेईचे आव्हान असेल. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही एकमेव जोडी या स्पध्रेसाठी पात्र ठरली आहे.
सायना, सिंधू क्रमवारीत स्थिर
मुंबई : जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपापले स्थान कायम राखले आहे. सायना सातव्या तर सिंधू दहाव्या स्थानी आहे. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने एका स्थानाने सुधारणा करत २७वे स्थान गाठले आहे. युवा किदम्बी श्रीकांतच्या स्थानात एकाने घसरण होऊन तो २३व्या स्थानी स्थिरावला आहे. एच. एस. प्रणॉय ३१व्या, आरएमव्ही गुरुसाईदत्त ३५व्या, सौरभ वर्मा ३७व्या स्थानी आहेत. दुहेरी प्रकारात ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडी २१व्या स्थानी स्थिर आहे. पुरुष आणि मिश्र दुहेरीच्या अव्वल २५ मध्ये एकाही भारतीय जोडीला स्थान मिळवता आलेले नाही.