भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती खेळाडू सायना नेहवाल हिचे जागतिक बॅडमिंटन सुपरसीरिजमधील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. अग्रमानांकित व ऑलिम्पिक विजेती ली झुईरुई हिने तिच्यावर २२-२०, ७-२१, २१-१३ अशी मात केली.  चुरशीने झालेल्या या लढतीत नेहवाल हिने पहिल्या दोन गेममध्ये सुरेख खेळ केला मात्र तिसऱ्या गेममध्ये तिचा खेळ अपेक्षेइतका झाला नाही. ५० मिनिटे चाललेल्या या सामन्यात चीनच्या झुईरुई हिने दुसरी गेम गमावल्यानंतरही बहारदार खेळ केला व नेहवालचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळविले. नेहवालने २००९ मध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती तर गतवर्षी तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.  
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या नेहवालने पहिल्या गेममध्ये सलग सहा गुण मिळविले मात्र झुईरुई हिने ९-९ अशी बरोबरी साधली. नेहवालने केलेल्या कमकुवत फटक्यांचा फायदा तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला मिळाला. नेहवालने बेसलाईनवरून बहारदार खेळ करीत पुन्हा १६-१३ अशी आघाडी घेतली. तथापि पुन्हा १६-१६ अशी बरोबरी झाली. त्यानंतर नेहवालने स्मॅशिंगच्या फटक्यांचा उपयोग करीत गेम जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र पुन्हा तिने चार गेमपॉइन्ट वाया घालवित आघाडी गमावली. ही गेम तिने २०-२२ अशी गमावली.
दुसऱ्या गेममध्ये नेहवालने स्मॅशिंगच्या आक्रमक फटक्यांचा उपयोग केला. तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचाही कल्पकतेने उपयोग केला. तिने सुरुवातीला आठ गुणांची आघाडी घेतली. तिने या गेमममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूला फारशी संधी दिली नाही. ही आघाडी वाढवीत तिने ही गेम घेत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये चिवट झुंज पाहावयास मिळाली. ७-७ अशा बरोबरीनंतर नेहवालने १०-८ अशी आघाडी मिळविली होती मात्र ११-११ अशा बरोबरीनंतर झुईरुई या स्थानिक खेळाडूने सफाईदार खेळ केला. तिने केलेल्या परतीच्या फटक्यांपुढे नेहवालचा बचाव निष्प्रभ ठरला.
अंतिम फेरीत झुईरुई हिला आपलीच सहकारी शिक्सियन वाँग हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. वाँग हिने उपांत्य लढतीत थायलंडच्या राचानोक इन्तानोन हिचा २१-१२, २१-१९ असा पराभव केला.