भारताच्या सानिया मिर्झाने बाबरेरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने खेळताना सिनसिनाटी चषक टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत पूर्वाश्रमीची जोडीदार मार्टिना हिंगीस आणि कोको व्हँडेवेघेचा ७-५, ६-४ असा पराभव करीत विजेतेपद काबीज केले. या जेतेपदासह सानियाने डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत महिला दुहेरी विभागात एकटीने अग्रस्थान पटकावले आहे.

सानिया हिंगीसच्या साथीने याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. मात्र ऑलिम्पिकच्या कालखंडात हिंगीसने सानियासोबत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २९ वर्षीय सानियाला एकटीलाच हे स्थान टिकवता आले आहे. सानिया-हिंगीस जोडीने महिला दुहेरीत आपले वर्चस्व प्रस्थापित करताना तीन ग्रँड स्लॅमसह एकंदर १४ विजेतेपदे जिंकली होती. रिओमध्ये हिंगीसने टायमा बॅकसिन्स्कीसोबत खेळताना स्वित्र्झलडला रौप्यपदक जिंकून दिले होते.