साव पावलो थरारनाटय़.. पावसाचा व्यत्यय.. अपघातांची मालिका.. पुढे जाण्यासाठी एकमेकांमध्ये रंगलेली चढाओढ.. यामुळे मोसमातील अखेरच्या ब्राझीलियन ग्रां. प्रि.मध्ये विश्वविजेतेपदासाठीचा खरा थरार अनुभवायला मिळाला. रेड बुलचा सेबॅस्टियन वेटेल आणि फेरारीच्या फर्नाडो अलोन्सो यांच्यात विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी चुरस होती.
सुरुवातीच्या लॅपमध्येच चौथ्या वळणाजवळ वेटेलच्या कारचा अपघात झाला. पण त्यातून सावरणाऱ्या वेटेलने सहाव्या क्रमांकावर मजल मारली आणि अखेर विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवणारा वेटेल फॉम्र्युला-वनच्या इतिहासातील सर्वात युवा ड्रायव्हर ठरला. काही ड्रायव्हर्समध्ये झालेल्या अपघाताचा फायदा मॅकलॅरेनच्या जेन्सन बटन याला झाला. बटनने फेरारीचे अलोन्सो आणि फेलिपे मासा यांचे आव्हान मोडीत काढून ब्राझीलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीवर नाव कोरले.
अलोन्सोने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असली तरी वेटेलने ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये तीन गुणाने बाजी मारली. अपघातामुळे अनेक वेळा पिट-स्टॉपमध्ये जाऊन गाडीची दुरुस्ती करून घेणाऱ्या वेटेलने येथील निसरडय़ा सर्किटवर अचूक नियंत्रण साधत शर्यत पूर्ण केली.
शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यावर मॅकलॅरेनचा लुइस हॅमिल्टन आणि सहारा फोर्स इंडियाचा निको हल्केनबर्ग यांच्यात आघाडी घेण्यासाठी चुरस रंगली होती. पण १७ लॅप शिल्लक असताना या दोघांमध्ये झालेल्या अपघातानंतर हॅमिल्टनला शर्यतीतून माघार घ्यावी लागली. मात्र हल्केनबर्गने पाचव्या क्रमांकावर मजल मारण्यात यश मिळवले.
रेड बुलचा मार्क वेबर चौथा आला. सात वेळा विश्वविजेतेपदाला गवसणी घालणारा महान ड्रायव्हर मायकेल शूमाकर याने सातवे स्थान पटकावत फॉम्र्युला-वनला अलविदा केला. टोरो रोस्सोच्या जीन-एरिक वर्गने याने आठवे तर सौबेरच्या कामुइ कोबायाशी याने नववे स्थान पटकावले. लोटसच्या किमी रायकोनेन याला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सहारा फोर्स इंडियाचा दुसरा ड्रायव्हर पॉल डी रेस्टा याने १९व्या क्रमांकावर मजल मारली.

मोसमातील अव्वल पाच ड्रायव्हर
ड्रायव्हर                     संघ          गुण
सेबॅस्टियन वेटेल    रेड बुल      २८१
फर्नाडो अलोन्सो      फेरारी      २७८
किमी रायकोनेन      लोटस     २०७
लुइस हॅमिल्टन        मॅकलॅरेन १९०
जेन्सन बटन         मॅकलॅरेन   १८८