टेनिस त्यांची सामाईक आवड.. लहानपणापासून याच खेळाचा ध्यास त्या दोघांनी घेतलेला.. कोर्टबाहेर जिवलग मैत्रिणी असणाऱ्या त्या बहिणी कोर्टवर मात्र एकमेकांच्या हाडवैरी होतात.. सातत्याचा अभाव आणि दर्जेदार खेळाऐवजी सवंग फॅशनला प्राधान्य देणाऱ्या महिला टेनिसमध्ये सातत्य आणि अव्वल दर्जाच्या टेनिससाठी विल्यम्स द्वंद्व ओळखले जाते.
विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत रंगलेल्या या द्वंद्वांत यंदाच्या वर्षांत जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या सेरेना विल्यम्सने व्हीनस विल्यम्सवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सेरेनाने नेहमीच्या वर्चस्वासह खेळताना ही लढत ६-४, ६-३ अशी जिंकली. सेरेनाने कारकीर्दीत व्हीनसवर मिळवलेला हा पंधरावा विजय आहे. सलग आठ गुणांच्या कमाईसह सेरेनाने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही झंझावाती खेळ करत सेरेनाने सहज विजय मिळवला.
अन्य लढतींमध्ये मारिया शारापोव्हाने झरिना डियासला ६-४, ६-४ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मॅडिसन की हिने ओल्गा गोवटरेसोव्हाचा ३६, ६-४, ६-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले. गार्बिन म्युगुरुझाने कॅरोलिन वोझ्नियाकीचा ६-४, ६-४ असा पराभव केला. व्हिक्टोरिया अझारेन्काने बेनिंडा बेनकिकवर ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवला. इंग्लंडची आशा असलेल्या अँडी मरेने तडाखेबंद सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध इव्हो कालरेव्हिकवर ७-६, ६-४, ५-७, ६-४ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०१३ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या मरेसमोर पुढच्या फेरीत कॅनडाच्या व्हासेक पॉसपिसीलचे आव्हान आहे.
फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने डेव्हिड गॉफिनला ७-६, ७-६, ६-४ असे नमवले. वादग्रस्त लढतीत रिचर्ड गॅस्क्वेटने निक कुर्यिगासचे आव्हान ७-५, ६-१, ६-७, ७-६ असे संपुष्टात आणले.
महिला दुहेरीत अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने अनाबेल मेडिना गॅरिग्युस आणि अरंक्टसा परा सॅन्टोजा जोडीवर ६४, ६-३ असा विजय मिळवला. रोहन बोपण्णाने फ्ड४रिन मर्गेआच्या बरोबरीने खेळताना ल्युकाझ क्युबोट-मॅक्स मिर्नी जोडीवर ७-६ (४), ६-७ (५), ७-५ (५), ७-६ (८) अशी मात केली. अलेक्झांडर पेया आणि ब्रुनो सोरेस जोडीने लिएण्डर पेस आणि डॅनियल नेस्टर जोडीला ६-३, ७-५, ३६, २-६, ६-२ असे नमवले. कनिष्ठ गटात ज्युआन पाब्लोने भारताच्या सुमीत नगालचे आव्हान ५-७, ६-२, ६-४ असे संपुष्टात आणले.