भारताच्या रिओ ऑलिम्पिक मोहिमेला जबरदस्त धक्का देणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यापाठोपाठ भारताचा गोळाफेकपटू इंद्रजित सिंह हादेखील उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीदरम्यान हरयाणाच्या २८ वर्षीय इंद्रजित सिंह याच्या नमुन्यांमध्ये प्रतिबंधित घटक आढळून आले. ‘नाडा’कडून इंद्रजित सिंह आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाला याबाबत कळविण्यात आले आहे. आता इंद्रजितकडे ‘एनएडीए’कडे फेरचाचणीची मागणी करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी आहे. ‘नाडा’कडून २४ जुलै रोजी इंद्रजित सिंहचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले होते.  इंद्रजित सिंह याने गेल्यावर्षीच्या आशियाई स्पर्धा, एशियन ग्रँड पिक्स, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये गोळाफेकीसाठी सुवर्णपदक मिळवले होते. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय अॅथलिट आहे.
या घटनेमुळे रिओला जाणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक चमुला मोठा धक्का बसला आहे. यंदाच्या स्पर्धेत गोळाफेकीत भारताला इंद्रजित सिंहकडून पदकाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. कालच मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, नरसिंग यादवने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. आपल्याशी घातपात झाल्याचा संशय त्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे हा वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोर्टात पोहोचला आहे.
त्याच्याविरोधात बरीच मंडळी एकवटली होती -जगमल सिंग