ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे गिमचेओन (दक्षिण कोरिया) येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची प्रमुख भिस्त किदम्बी श्रीकांत व पी.व्ही.सिंधू यांच्यावर असेल.
सायनाने २०१०मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मे महिन्यात होणाऱ्या थॉमस व उबेर चषक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने विश्रांती मिळावी म्हणून तिने आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. साहजिकच भारताच्या पदकाच्या आशा श्रीकांत व सिंधू यांच्या कामगिरीवर अवलंबून आहेत.
गतवर्षी मलेशियन व मकाऊ या दोन स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविणारी १८ वर्षीय खेळाडू सिंधू ही भारताची भावी विश्वविजेती खेळाडू म्हणून ओळखली जात आहे. तिला आशियाई स्पर्धेतील पहिल्या फेरीत च्युंग निगान यि हिच्याशी खेळावे लागणार आहे. त्यानंतर तिच्यापुढे जपानची एरिको हिरोसी हिचे आव्हान असणार आहे. हे दोन्ही अडथळे पार केल्यास तिची शियान वांग हिच्याशी गाठ पडण्याची शक्यता आहे. वांग हिला अव्वल मानांकन मिळाले आहे.
पुरुषांच्या एकेरीत श्रीकांतला सातवे मानांकन मिळाले आहे. विजेतेपदाच्या मार्गात त्याच्यापुढे दोन वेळा ऑलिम्पिक विजेता व पाच वेळा विश्वविजेता असलेला लिन डॅन याचा अडथळा असणार आहे. डॅनला या स्पध्रेसाठी दुसरे मानांकन मिळाले आहे. दुखापतीनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर डॅन याची ही दुसरीच स्पर्धा आहे. नुकत्याच झालेल्या चीन मास्टर्स स्पर्धेत त्याने अजिंक्यपद मिळविले आहे. त्याने अंतिम फेरीत आपलाच सहकारी हुवेई तियान याच्यावर मात केली होती.
भारताच्या पारुपल्ली कश्यप या ऑलिम्पिकपटूला मलेशियाच्या गोह सून हुआत याच्याशी खेळावे लागणार आहे तर आर.एम.व्ही.गुरुसाईदत्त याची थायलंडच्या फेतप्रदाब खोसित याच्याशी लढत द्यावी लागेल. तसेच दुहेरीत मनू अत्री व बी.सुमीत रेड्डी यांच्यापुढे मलेशियाच्या लो जुआन शेन व हेग नेल्सन वेई कीट यांचे आव्हान असेल. अक्षय देवळकर व प्रणव चोप्रा यांची चीनच्या झांग वेन व वांग यिल्व यांच्याशी गाठ पडेल. याचप्रमाणे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा व ज्वाला गट्टा यांची सिंगापूरच्या फु मिंगतियान व नीओ यु यान व्हेनेसा यांच्याशी लढत होईल.