१६ वर्षीय विद्यार्थ्यांला १४-वर्षांखालील स्पर्धेत खेळवले; एमसीएकडून खेळाडूवर बंदी

वयचोरी प्रकरणात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत राहिलेली आणि याबाबत बंदीची शिक्षा अनुभवलेल्या रिझवी फ्रिंगफिल्ड शाळेकडून अजूनही हे प्रकार सुरू असल्याचेच दिसून येत आहेत. या शाळेच्या सोहम पानवलकरचा जन्म २ मार्च २००० या दिवशी झाला असला तरी त्याचे जन्मवर्ष २००२ असल्याचे दाखवले जात आहे. त्याचबरोबर १६ वर्षांच्या या खेळाडूला १४-वर्षांखालील स्पर्धेत बिनधास्तपणे खेळवण्याचा प्रतापही रिझवी शाळेने केलेला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी सोहमचे बाबा समीर यांना याबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती आणि आठवडय़ाभरात त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते; पण या गोष्टीला जवळपास महिना झाल्यावरही त्यांनी आपली बाजू न मांडल्यामुळे एमसीएने सोहमवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जन्मदाखल्यानुसार सोहमचे वय १६ वर्षे दाखवत आहे. याबाबत त्याचे वडील समीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘‘सोहमचे जन्म वय २००२ साल आहे. तुम्हाला जी माहिती मिळाली ती खोटी आहे. त्याचबरोबर सोहम २०१६ सालामध्ये एकही सामना खेळलेला नाही.’’

रिझवी शाळेने मुंबई शालेय क्रीडा असोसिएशनकडे खेळाडूंच्या वयाबाबत दिलेल्या माहितीमध्ये सोहमचे वय १४ वर्षे दाखवले आहे. सोहमच्या शाळेचे प्रशिक्षक राजू पाठक यांनीही याच पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत सांगितले की, ‘‘सोहमच्या वडिलांनी शाळेमध्ये जे पुरावे सादर केले. त्यानुसार तो १४ वर्षांचा आहे. याबाबत काही जणांनी आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे आम्ही त्याला या वर्षांत एकही सामना खेळवलेला नाही.’’

सोहम रिझवी शाळेकडून २०१६ साली १४-वर्षांखालील गाइल्स शिल्ड स्पर्धेत खेळला आहे. स्वामी विवेकानंद शाळेविरुद्ध खेळताना सोहम आणि श्रेयस मंडलिक यांनी ३१४ धावांची भागीदारीही रचली होती. या सामन्यात सोहमने १८४ चेंडूंत ११५ धावा केल्या होत्या. त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या याच स्पर्धेतील सामन्यात सोहमने ९४ धावांची खेळीही साकारली होती. या आकडेवारीनुसार सोहमचे बाबा आणि त्याचे प्रशिक्षक राजू पाठक खोटे बोलत असल्याचे सिद्ध होत आहे.

या संदर्भात एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. उन्मेश खानविलकर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, ‘‘हे प्रकरण समोर आल्यावर आम्ही सोहमच्या बाबांकडे याबाबत विचारणा केली होती, त्याचबरोबर त्यांना आपली बाजू मांडण्यासही सांगितले होते; पण या गोष्टीला महिना झाला असला तरी त्यांनी आपली बाजू मांडलेली नाही. आम्ही सोहमवर सध्या तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर आम्ही कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर शिस्तपालन समिती यावर योग्य तो निर्णय घेईल. जर सोहम दोषी आढळला तर त्याच्यासह शाळेवरही आम्ही कडक कारवाई करणार आहोत.’’

एमसीएने सोहमवर तात्पुरती बंदी घालून योग्य दिशेने पाऊल उचलले आहे; पण वारंवार वयचोरी प्रकरणात चर्चेत असलेल्या रिझवी शाळेवर आणि सोहम १६ वर्षांचा असूनही १४-वर्षांखालील स्पर्धासाठी पाठवणाऱ्या त्याच्या पालकांवर एमसीए नेमकी कोणती कडक कारवाई करते, याकडे दर्दी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.