एका सुप्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेल्या वादग्रस्त जाहिरातीप्रकरणात भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिनाकी चंद्रा घोस आणि आर.के.अग्रवाल यांच्या खंडपीठाने मासिकाच्या मुखपृष्ठावरील वादग्रस्त ठरलेल्या  ‘त्या’ छायाचित्रावरून धोनीवर फौजदारी कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच या प्रकरणावरून धोनीविरोधातील कारवाई न थांबविण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालायने यावेळी स्थगिती दिली.

एका मासिकाच्या एप्रिल २०१३च्या अंकामध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. छायाचित्रात धोनीच्या हातांमध्ये विविध कंपन्यांची उत्पादने दाखविण्यात आली होती. त्यामध्ये एक बूटही दाखविण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद उफाळून आला. या जाहिरातीचा विरोध करत या जाहिरातीतून धोनीने देशातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार जयकुमार हिरेमठ या सामाजिक कार्यकर्त्याने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेऊन देवी-देवतांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम २९५ अंतर्गत धोनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार धोनीला न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स देखील धाडण्यात आले होते. त्यानंतर धोनीने त्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.