भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेण्याची वेळ आल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद आता विराट कोहलीकडे देण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. धोनीहा कसोटी संघाचा कर्णधार नाही. तो एकदिवसीय व ट्वेन्टी-२० संघासाठी उत्तम कर्णधार आहे. त्यामुळे धोनीकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून ते विराट कोहलीकडे सोपविले गेले पाहिजे. कारण, कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी युवा खेळाडूची गरज आहे.” तसेच “भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य कठोर निर्णय घेण्याची क्षमता ठेवत नाहीत. खेळाडू स्वत:हून निवृत्त होण्याची वाट ते पाहत राहतात. भारतीय संघाच्या निवड समितीने ऑस्ट्रेलिया संघाच्या निवड समितीसारखे निर्णय घ्यायला हवेत.” असेही चॅपेल म्हणाले.


विराट कोहलीमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि त्याचे वय ३० वर्षांच्या पलीकडे गेल्यानंतर त्याला कर्णधारपद देऊन काहीच उपयोग नाही. खेळाडू यशोशिखराच्या दिशेने यशस्वीरित्या वाटचाल करत असतानाच त्याला चांगल्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असते त्यामुळे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व आता विराट कोहलीला देण्याची योग्य वेळ असल्याचेही चॅपेल यांनी स्पष्ट केले.