रणजी क्रिकेट स्पध्रेतील पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभी करूनही अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागलेल्या विदर्भ संघासमोर गुरुवारपासून दिल्लीचे आव्हान आहे. गौतम गंभीर, इशांत शर्मा, उन्मुक्त चंद या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्लीसमोर विदर्भचा चांगलाच कस लागणार आहे.

ओदिशाविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर आदित्य शानवरे याच्यासह जितेश शर्मा, गणेश सतीश, वासिम जाफर यांच्यावर विदर्भच्या फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत उमेश यादव हा त्यांचा हुकमी एक्का आहे. त्याला श्रीकांत वाघ, रविकुमार ठाकूर, अक्षय वाखारे यांची साथ मिळाल्यास दिल्लीचा कस लागेल, हे निश्चित.

ओदिशाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना विदर्भने शानवरे  (११९) आणि उमेश यादव (नाबाद १२८) धावांच्या जोरावर ४६७ धावांचा डोंगर उभा केला होता. त्या उत्तरात उतरलेल्या ओदिशाचा पहिला डाव २७४ धावांत गुंडाळून विदर्भने त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावात ओदिशाने चिवट खेळ करून पराभव टाळला आणि विदर्भला तीन गुणांवर समाधान मानावे लागले.