भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांची धुलाई करण्यासोबत त्याच्या कूल अंदाजासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या या अंदाजामुळेच केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याच्या अशाच एका चाहत्यासाठी विराटने व्हिडिओ मॅसेज पाठवला आहे.
पाकिस्तानचे अम्पायर अलीम दार यांचा मुलगा हसन हा विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. अलीम दार यांनी आपल्या मुलाचा एक व्हिडिओ विराटला दाखवला आणि तो त्याचा चाहता असल्याचे सांगितले. आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्यात विराटही मागे राहत नाही. त्याने लगेच अलीम दार यांच्या मुलासाठी एक वैयक्तिक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत त्याच्यासोबत अलीम दारही आहेत. मी तुझ्या अब्बूसोबत इथे बसलो आहे. तुझा व्हिडिओ मिळाला. खूप आभारी आहे. जसं तू म्हणालास की कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मी म्हणेन की मेहनत कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. आपली लवकरच भेट होईल अशी मी आशा करतो, असे विराटने व्हिडिओत म्हटलेय. याचसोबत त्याने अलीम यांच्या मुलाला त्याच्या वडिलांसह एखाद्या दौ-यावर येण्याचेही आमंत्रण दिले.
हसन हादेखील एक क्रिकेटपटू असून त्याने आपल्या वडिलांच्या मार्फत विराटला व्हिडिओ पाठवला होता. कोहलीने त्याच्या व्हिडिओला उत्तर देत भरपूर मेहनत घेण्याचा सल्ला दिला.