मी कोणी महान कर्णधार नाही. सुदैवाने मला कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारताना उत्तम सहकारी लाभले आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच मी यशस्वी कर्णधार झालो आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

‘‘संघातील सहकाऱ्यांकडून अपेक्षेइतकी कामगिरी होत नसेल तरच कर्णधारावर टांगती तलवार राहते. माझ्याबाबत असे घडलेले नाही. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू वैयक्तिकरीत्या सर्वोत्तम कामगिरी करीत असतो व ही कामगिरी करताना तो सांघिक कौशल्यातही तितकाच महत्त्वाचा वाटा उचलत असतो. न्यूझीलंड व इंग्लंडसारख्या तुल्यबळ संघांविरुद्ध आम्हाला कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवता आले. त्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांचाच अधिक वाटा आहे,’’ असे कोहलीने सांगितले.

स्टीव्ह स्मिथचे कौतुक करताना कोहली म्हणाला, ‘‘स्मिथ व माझी तुलना करणे अयोग्य आहे. तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याच्याविषयी मला खूप आदर आहे. लेग-स्पिनर म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या या खेळाडूने सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळेच स्मिथ व त्याच्या सहकाऱ्यांना मी कमी लेखत नाही. आम्ही बलाढय़ खेळाडूंशी सामना करीत आहोत, हे मानूनच खेळणार आहोत. गहुंजेची खेळपट्टी कोरडी व ठणठणीत असल्यामुळे विजय मिळविण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे.’’

 

हरभजनच्या शेरेबाजीला कामगिरीद्वारेच उत्तर -स्मिथ

पुणे : खुर्चीत बसून शेरेबाजी करणे सोपे असते. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आमचा संघ कमकुवत असल्याची टिप्पणी केली आहे. त्याला आम्ही सर्वोत्तम कामगिरीद्वारेच उत्तर देऊ, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सांगितले.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शेरेबाजीत स्वारस्य असते व प्रत्यक्ष मैदानावर त्यांची कामगिरी कमकुवतच होत असते. भारतीय संघ

३-० अशा फरकाने मालिका जिंकेल, असे हरभजनने म्हटले होते. त्याबाबत विचारले असता स्मिथ म्हणाला, ‘‘आम्हाला शेरेबाजीपेक्षाही मैदानावरील यश अधिक महत्त्वाचे वाटत आहे. आम्ही भारतीय फिरकी गोलंदाजांना घाबरत नाही.  आमच्या संघातील खेळाडूंना भारतामधील खेळपट्टय़ा व फिरकी गोलंदाजांचा भरपूर अनुभव आहे. त्यामुळे आमच्यावर कोणतेही दडपण नाही.’’

‘‘खेळपट्टी कोरडी व ठणठणीत वाटत आहे. अंतिम ११ खेळाडूंची निवड आम्ही नाणेफेकीपूर्वी करणार आहोत. ही निवड करताना आमच्यापुढे कोणत्याही समस्या नाहीत. संघात अष्टपैलू खेळाडूंची कमतरता नाही. भारतात आम्ही विजय मिळवण्यासाठीच आलो आहोत,’’ असे स्मिथने सांगितले.