‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हटलं जातं, अगदी तसेच काहीसे विराट कोहलीबाबत घडल्याचे त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. कारण, कोहलीच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराटमध्ये जन्मत: नेतृत्त्वगुण होते, असे ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अद्याप एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. तर धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संघाचे कर्णधारपद कोहलीकडे देण्यात आले आहे. कोहलीने आपल्या पहिल्या कर्णधारी एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून संघाला विजय प्राप्त करून दिला. कोहलीच्या कर्णधारी कामगिरीबद्दल बोलताना राजकुमार म्हणाले की, विराटमध्ये जन्मत: नेतृत्त्वगुण होते. अकादमीकडून खेळताना देखील कोहली संघाचे नेतृत्त्व करायचा. कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर विराटची कामगिरी आणखी उंचावल्याचे दिसून आले. कोहली सध्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत आहे आणि आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यायला हवा, असेही ते पुढे म्हणाले.

वाचा : ‘कोहलीच्या फलंदाजीत मला कोणत्याही त्रुटी आढळत नाहीत’

 

विराटने आपल्या फलंदाजी तंत्रात खूप बदल केले आहेत. विराट म्हणजे क्रिकेट विश्वाला मिळालेली एक अद्भूत देणगी आहे. तो परिस्थितीनुसार फलंदाजी करतो हा त्याच्यातील सर्वोत्तम गुण असल्याचे शर्मा म्हणाले. कोहलीच्या आवडत्या फटक्याचीही माहिती शर्मा यांनी यावेळी दिली. फ्लिक शॉट लगावणे हा त्याचा आवडीचा विषय आहे. पण फ्लिक फटका खेळताना तो बाद व्हायचा त्यामुळे मी त्याला तो फटका खेळण्यासाठी नेहमी विरोध करायचो. पण आपल्या कमकुवत बाजूवर त्याने प्रचंड सरावाच्या माध्यमातून मात केली आणि आज विराट फ्लिक फटका अगदी सहजपणे लगावतो. फ्लिक फटक्यासोबतच कोहलीला कव्हर ड्राईव्ह खेळायला आवडते, असे शर्मा यांनी सांगितले.
इंग्लंड दौऱयात कोहलीची कामगिरी तितकीशी प्रभावी नव्हती. याबाबत बोलताना शर्मा म्हणाले की, इंग्लंडमध्ये कोहलीने आपल्या फलंदाजीत कोणतीही कसर सोडली नव्हती. त्यावेळी अँडरसन खूप चांगली गोलंदाजी करत होता. कोहलीच्या फटक्यांना यावेळी दोष देता येणार नाही. प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये वाईट काळ येतो पण कोहलीच्याबाबत हा काळ केवळ काही सामन्यांपूरता होता. त्याने आपल्या झालेल्या चूकांवर मेहनत घेऊन त्या सुधारल्या आणि पुन्हा सुरात फलंदाजीला सुरूवात केली.

वाचा: विराटने ‘बटर चिकन’ खाणं सोडलं!