भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदला सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत खाते उघडण्यात यश मिळाले. त्याने तिसऱ्या फेरीत व्हॅसेलिन तोपालोव्हला बरोबरीत रोखले.
या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आनंदला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेतील आघाडीवीर तोपालोव्हविरुद्ध त्याने कल्पकतेने चाली करीत डाव बरोबरीत ठेवण्यात यश मिळवले. अन्य लढतीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्ह याच्यावर मात केली. स्थानिक खेळाडू वेस्ली सो याने रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक याच्यावर शानदार विजय मिळवला. लिव्हॉन आरोनियनने नेदरलॅण्ड्सच्या अनिष गिरीविरुद्ध बरोबरी स्वीकारली. हिकारू नाकामुरा व फॅबिआनो कारुआना या दोन्ही अमेरिकन खेळाडूंमधील लढत बरोबरीत सुटली. तिसऱ्या फेरीअखेर तोपालोव्हने अडीच गुणांसह आघाडी राखली आहे. कार्लसन, गिरी व आरोनियन यांनी प्रत्येकी दोन गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. नाकामुरा, वेस्ली, लाग्रेव्ह यांचा प्रत्येकी दीड गुण झाला आहे. ग्रिसचुकचा एक गुण असून आनंद व कारुआना यांचा प्रत्येकी अर्धा गुण आहे.
आनंदने दोन डाव गमावल्यानंतर तोपालोव्हविरुद्ध बचावात्मक खेळावरच भर दिला. सुरुवातीला आनंदची स्थिती वरचढ होती. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेतले. ३१व्या चालीला दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.  कारुआनाविरुद्ध निसटता विजय मिळविणाऱ्या कार्लसनने लाग्रेव्हविरुद्धच्या डावात विश्वविजेत्यास साजेसा खेळ केला. लाग्रेव्हला डाव बरोबरी करण्याची संधी होती, मात्र कार्लसनने सफाईदार चाली करीत दिमाखदार विजय मिळवला. इंग्लिश ओपनिंगचा उपयोग करीत वेस्लीने ग्रिसचुकवर मात करीत आपला पहिला विजय नोंदवला. डावाच्या मध्यास वजिरा-वजिरी केल्यानंतर वेस्लीने कल्पक चाली केल्या व ग्रिसचुकला निष्प्रभ केले.