विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी, सचिन तेंडुलकरचा क्रिकेट कारकीर्दीतील अखेरची कसोटी याचप्रमाणे अन्य अनेक महत्त्वाच्या सामन्यांचे यजमानपद मुंबईच्या वानखेडे स्टेडियमने समर्थपणे सांभाळले होते. परंतु थेट टीव्ही प्रक्षेपणाच्या बाबतीत हे स्टेडियम अयोग्य असल्याचा शेरा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) समितीने दिल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बीसीसीआयची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होणार असल्यामुळे हा शोध बीसीसीआयला लागला असावा, असे मत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बीसीसीआयच्या टीव्ही प्रक्षेपण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये देशातील विविध स्टेडियम्सचा आढावा घेण्यात आला. वानखेडेवरील टीव्ही प्रक्षेपण व्यवस्था सर्वात वाईट असल्याचे ताशेरे यावेळी ओढण्यात आले. सामन्यांचे यजमानपद सांभाळणाऱ्या देशातील विविध स्टेडियम आणि तेथील व्यवस्था यांची बीसीसीआय पाहणी करीत असून, त्यानुसारच आगामी सामन्यांसाठी या स्थळांचा विचार करण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते.
हैदराबादचे उप्पल स्टेडियम, कटकचे बाराबती स्टेडियम आणि झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियमबाबत टीव्ही प्रक्षेपण समितीने समाधान प्रकट केले. मात्र वानखेडे स्टेडियमबाबत या समितीने तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली. वानखेडेची प्रॉडक्शन रूम ही अतिशय धोकादायक स्थितीत असून, ती कधीही ढासळू शकते, असेही मत या समितीने व्यक्त केले
आहे.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वानखेडेच्या बाबतीत हे राजकारण केले जात आहे. शरद पवार एमसीएचे अध्यक्ष असल्यामुळे बीसीसीआयवर राज्य करताना सत्ताधाऱ्यांना ते अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळेच एमसीएला वारंवार लक्ष्य ठरवले जात असल्याचे क्रिकेटवर्तुळात म्हटले जात आहे. परंतु टीव्ही प्रक्षेपण व्यवस्थेविषयी एमसीएकडे अद्याप कोणीही नाराजी प्रकट केलेली नाही. प्रक्षेपण व्यवस्थेसाठी समितीला आवश्यक असलेली व्यवस्था आम्ही करून देऊ शकतो, असे एमसीएच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत टीव्ही प्रक्षेपण समितीचे प्रमुख जी. विनोद म्हणाले की, ‘‘स्थानिक क्रिकेटमधील अनेक सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे, अशी बीसीसीआयची योजना आहे. याबाबत स्टार स्पोर्ट्शी बोलणी सुरू आहेत. याचप्रमाणे स्थानिक सामन्यांचे बीसीसीआय डॉट टीव्ही या संकेतस्थळावर प्रक्षेपण करता येऊ शकेल. पुढील बैठकीमध्ये आम्ही याबाबत निश्चित धोरण ठरवू.’’