खेळापेक्षा खेळाडू मोठा झाला की, खेळाचा प्रवास अधोगतीने सुरू होतो, याची जाणीव कबड्डीला होण्याची नितांत गरज आहे. नुकत्याच पुण्यात झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत महिलांमध्ये अपेक्षेप्रमाणेच पुण्याला नवव्यांदा जेतेपद मिळवले, तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने पुण्याला हरवून k04विजेतेपदाचा मान मिळवला. गतविजेत्या सांगलीला हरवण्याचा पुण्याचा पराक्रम हा अचंबित करणारा होता. राज्य अजिंक्यपद स्पध्रेत संघांची म्हणजेच जिल्ह्यांची आकडेवारी जरी वाढणारी असली तरी, अस्सल कबड्डीचा थरार मात्र मोजक्याच संघांच्या सामन्यांमध्ये दिसला. त्यामुळे बाद फेरीतच रोमहर्षकता दिसते, याचाच प्रत्यय पुन्हा आला. स्पर्धेचे कवित्व संपल्यावर आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राच्या गतवर्षीच्या कामगिरीचे त्यावर कोणतेही पडसाद उमटलेले दिसत नाहीत, ही मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे.

राज्य अजिंक्यपद स्पध्रेच्या प्राथमिक फेरीत दुबळ्या संघांविरुद्ध आपला ठसा उमटवणारे अनेक दिग्गज खेळाडू बाद फेरीत तशी कामगिरी करू शकले नाहीत. परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, प्रो-कबड्डीमुळे तारांकित झालेले आणि मानाचे असे कोंदण असलेले खेळाडू यंदाही महाराष्ट्राच्या संघांमध्ये दिसत आहेत. परंतु कबड्डीचे दुर्दैव असे की, खेळाडूंची कामगिरी आकडय़ात मोजणारी मापनश्रेणी किंवा सांख्यिकी व्यवस्था अद्याप विकसित झालेली नाही. त्यामुळे तज्ज्ञ निवड समितीने निवडलेला आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा शिक्का बसलेला महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पध्रेत पुन्हा सुवर्णकाळ येईल, या आशेने सज्ज होईल. ही निवड करताना मग जिल्ह्याचा संघ कोणत्या फेरीत गेला, त्यानुसार किती खेळाडू बसतील, याची समीकरणे जशी पाळली गेली. तसेच महत्त्वाच्या जिल्ह्यांना दुखावले जाणार नाही, ही परंपरासुद्धा पाळली गेली.

राज्य अजिंक्यपद स्पध्रेत खेळणाऱ्या जिल्ह्यांचे संघ जिल्हा अजिंक्यपद स्पध्रेतून तावून सुलाखून निवडले जातात. पण ज्या जिल्ह्यांच्या जिल्हा अिजक्यपद स्पर्धाच होत नाही, त्यांचे संघसुद्धा या स्पध्रेत कसे खेळतात? काही जिल्हे महत्त्वाच्या खेळाडूंना घेऊन एक-दोन दिवसांत चाचपणी उरकून आपले संघ निवडतात. या जिल्ह्यांमध्ये नेमकी कबड्डीची काय स्थिती आहे, याची पडताळणी राज्य कबड्डी असोसिएशन कधी करते का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत.
मागील वर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राचा पुरुष संघ राजस्थानकडून पराभूत झाला, तर महिला संघ उपांत्य फेरीत हरला. महाराष्ट्राचा संघ का हरला, याचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. पण तिला या पराभवासाठी कोणीच जबाबदार असल्याचे दिसले नाही. महाराष्ट्राच्या पराभवाला जबाबदार धरणारे खरेच काही घडले नसेल तर मग चौकशी समितीचा फार्स का करण्यात आला? पाण्यात काहीतरी पडल्याशिवाय तरंग उमटत नाहीत, याची जाणीव जशी कबड्डीतील प्रशासकांना आहे, तशीच चाहत्यांनाही आहे.

मोठेपणाचा टिळा लावलेल्या खेळाडूंच्या पलीकडे बरीच गुणवत्ता महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. जसे पुण्याच्या पुरुष संघाचे क्षेत्ररक्षण लाजवाब होते, तसेच उपनगरच्या मुलींनीही आपल्या दिमाखदार क्षेत्ररक्षणाने मुंबईसारख्या संघाला हरवून आपली छाप पाडली. याचप्रमाणे अनेक मोठय़ा आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बाद फेरीत चढाया अपयशी ठरल्या. त्यामुळे महाराष्ट्रात गुणवत्तेचे पीक आहे, हे म्हणायला जागा आहे. दुखापती हा खेळाडूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. एक दिग्गज खेळाडू आपला संघ अंतिम फेरीत पोहोचल्यावर दुखापतीमुळे खेळू शकला नाही. दुर्दैवाने या संघात चांगल्या चढाईपटूंची वानवा होती. त्यामुळे हा खेळाडू अंतिम सामन्यात दुखापत सावरून उभा जरी राहिला असता तरी प्रतिस्पर्धी संघावर त्याचा प्रभाव पडला असता. अशा अपयशी आणि दुबळ्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघात स्थान द्यावे का? परंतु मोठय़ा खेळाडूंना संघात स्थान दिले नाही तर त्यांच्यावर अन्याय झाला, अशी जनमानसातून टीका होईल, या भयाने कडक निर्णय घ्यायला महाराष्ट्राचे कबड्डी क्षेत्र धजावले नसेल.

मुंबईच्या पुरुष संघाकडे पाहिल्यास सर्वात जास्त व्यावसायिक आणि स्थानिक संघ असा टेंभा मिरवणारा हाच का तो संघ असा प्रश्न पडत होता. मुंबईच्या कबड्डी संघाचा एके काळी मोठा रूबाब होता. त्याचप्रमाणे नावाजलेल्या खेळाडूंच्या खेळाचाही दबदबा होता. परंतु मुंबईच्या पुरुष संघात मैदानावर लक्षवेधी प्रभाव दाखवतील, अशा खेळाडूंची वानवाच सध्या दिसत असून, महिला संघात मोठी नावे असतानाही त्यांच्याकडून अपेक्षांची पूर्तता झाली नाही.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेसाठी अंतिम संघ निवड जाहीर केली आहे. मात्र राष्ट्रीय स्पध्रेसाठी २१ खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर केला आहे. पुण्यात होणाऱ्या सराव शिबिरानंतर अंतिम संघनिवड होईल. ही निवड करताना तरी कडक पावले उचलली जातील का, याची कबड्डीक्षेत्रात उत्सुकता आहे.