‘केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मला जाहीर केलेला द्रोणाचार्य पुरस्कार हा माझा गौरव नसून देशातील महिला बॉक्सिंगचाच सन्मान आहे,’ असे ज्येष्ठ बॉक्सिंग प्रशिक्षक सागरमल दयाल यांनी सांगितले.

दयाल यांनी सुरुवातीला महिला बॉक्सिंग संघासाठी साहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती एम.सी.मेरी कोम, राष्ट्रकुल कांस्यपदक विजेती पिंकी राणी यांच्यासह अनेक खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

दयाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या एल. सरिता देवीने २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मात्र पंचांच्या पक्षपाती निर्णयामुळे उपांत्य फेरीत आपल्याला पराभव स्वीकारावा लागला व त्याचा निषेध म्हणून तिने हे पदक स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिच्यावर कारवाईही झाली होती.

दयाल यांनी या घटनेविषयी सांगितले की, ‘सहनशीलतेला देखील काही मर्यादा असतात. सरिताची प्रतिस्पर्धी पराभूत झाल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाही पंचांनी सरिताच्या विरोधात गुण दिले होते.  प्रशिक्षक म्हणून मला तिची बाजू घेणे स्वाभाविकच होते. सरितावर एक वर्षांकरिता बंदी घालण्यात आली. मलाही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अधिकृत प्रशिक्षक मंडळातून डच्चू देण्यात आला. मात्र त्याबद्दल मला  गैर वाटत नाही. कारण मी सत्याचीच बाजू घेतली होती.’