30 May 2016

भूपती व बोपण्णाचे ऐतिहासिक विजेतेपद हुकले

जागतिक टेनिस मालिकांमध्ये विजेतेपद मिळविणारी पहिली भारतीय जोडी होण्याचा विक्रम महेश भूपती व रोहन

पी.टी.आय. लंडन | November 14, 2012 4:06 AM

जागतिक टेनिस मालिकांमध्ये विजेतेपद मिळविणारी पहिली भारतीय जोडी होण्याचा विक्रम महेश भूपती व रोहन बोपण्णा यांना साधता आला नाही. स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलिअर्स व मार्क लोपेझ यांनी त्यांचा ७-५, ३-६, १०-३ असा पराभव केला.
प्रथमच या मालिकेच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भूपती व बोपण्णा या भारतीय जोडीने उपान्त्य फेरीत लिअँडर पेस व त्याचा चेक प्रजासत्ताकचा सहकारी रादेक स्टेपानेक यांच्यावर मात केली होती. भूपती याला पाचव्यांदा या मालिकेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यापूर्वी त्याने पेस याच्या साथीत १९९७, १९९९ व २००० मध्ये तर मॅक्स मिर्नयी याच्या साथीत २०१० मध्ये उपविजेतेपद मिळविले होते.
ही स्पर्धाजिंकणारी मार्सेल व मार्क ही दुसरी स्पॅनिश जोडी आहे. यापूर्वी १९७५ मध्ये जुआन गिसबर्ट (वरिष्ठ) व मॅन्युअल ओरान्टेस यांनी ही स्पर्धा जिंकली होती.
भूपती व बोपण्णा यांनी स्पॅनिश जोडीस कौतुकास्पद लढत दिली. पहिल्या सेटमध्ये बोपण्णाची सव्‍‌र्हिस तोडून स्पॅनिश जोडीने ३-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र भारतीय जोडीने दहाव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला आणि ५-५ अशी बरोबरी साधली.
तथापि, पुढच्या गेमच्या वेळी भूपतीची सव्‍‌र्हिस तोडली गेली. १२व्या गेमच्या वेळी भारतीय जोडीस सव्‍‌र्हिसब्रेकची संधी मिळाली होती, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.
पहिला सेट गमावल्यानंतर दडपण न घेता भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये चतुरस्र खेळ केला. त्यांनी आठव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसब्रेक मिळवत ५-३ अशी आघाडी घेतली. पाठोपाठ बोपण्णाने स्वत:ची सव्‍‌र्हिस राखली आणि हा सेट घेतला. साहजिकच तिसऱ्या सेटविषयी उत्सुकता निर्माण झाली. तथापि या निर्णायक सेटमध्ये स्पॅनिश जोडीने निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी सुरुवातीस ४-० अशी आघाडी घेतली आणि ही आघाडी मोडून काढणे भारतीय जोडीस जमले नाही. त्यातच भूपती व बोपण्णा यांना आपल्या व्हॉलिजवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा स्पॅनिश जोडीस मिळाला.
भूपती व बोपण्णा यांनी या मोसमात दुबई व पॅरिस मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. पुढच्या मोसमात भूपती हा डॅनियल नेस्टॉर याच्या साथीत खेळणार असल्यामुळे बोपण्णा याचा सहकारी अद्याप निश्चित व्हायचा आहे.  

First Published on November 14, 2012 4:06 am

Web Title: world tennis tournament bhupathi and bopanna lost final