जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सर्बियाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेच्या जागतिक गटाच्या प्ले-ऑफ लढतीसाठी निवड समितीने अव्वल एकेरी टेनिसपटू सोमदेव देववर्मनच्या नेतृत्वाखाली सहासदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अपेक्षेप्रमाणेच युकी भांब्रीने पुनरागमन केले आहे.
बुसानला भारतीय संघाने कोरियाचा ३-१ असा पराभव करून प्ले-ऑफमधील स्थान निश्चित केले. पायाला झालेल्या दुखापतीमुळे युकी त्या लढतीमध्ये खेळू शकला नव्हता.
अनुभवी रोहन बोपण्णा आणि साकेत मायनेनी यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर रामकुमार रामनाथ आणि जीवन नेदुनचेझियान हे दोन राखीव खेळाडू आहेत. बंगळुरूच्या कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या यजमानपदाखाली १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या लढतीसाठीच्या भारतीय संघातून सनम सिंगला वगळण्यात आले आहे.
आशिया चषक स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टेनिस संघावर टीका झाल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष अनिल धुपार यांनी खेळाडूंचे क्रमवारीतील स्थान लक्षात घेऊन संघाची निवड केली. आशिया चषकासाठी सनम सिंगला (३९१) संधी देताना जीवन (२९७) आणि रामकुमार (३०५) यांना डावलण्यात आले. निवड समिती पक्षपात करीत असल्यामुळे दक्षिण विभागातील खेळाडूंना संधी नाकारण्यात येते, असे आरोप तामिळनाडू टेनिस असोसिएशनने केले होते.
लिएण्डर पेसने वैयक्तिक कारणास्तव या लढतीतून माघार घेतली आहे. बोपण्णा आणि मायनेनी यांच्यावर भारताच्या दुहेरी सामन्याची मदार असेल. चायनीज तैपेई आणि कोरियाविरुद्धच्या लढतीत ही जोडी अपराजित राहिली आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिकशिवाय सर्बियाचा संघ भारतात येणार आहे. परंतु तरीही डुसान लाजोव्हिक (६०), फिलिप क्रॅजिनोव्हाक (११०) आणि इलिजा बोझोलजाक (१८२) आणि ग्रँडमास्टर जेतेपदे खात्यावर असलेल्या नेनाद झिमॉन्जिक यांच्यासारखे दिग्गज खेळाडू या संघात आहेत.