रशियाच्या सोळा मल्लांचा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक कुस्ती परिषदेने त्यांच्या सहभागाला परवानगी दिली आहे. मात्र फ्रीस्टाईल प्रकारात व्हिक्टर लेबेदेव्ह या माजी विश्वविजेत्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

व्हिक्टरने ५५ किलो गटात दोन वेळा जागतिक विजेतेपद पटकाविले होते. व्हिक्टरची २००६ मध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेच्या वेळी चाचणी घेण्यात आली होती व त्यामध्ये तो दोषी आढळला होता. त्याने गतवर्षी युरोपियन क्रीडा स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात अजिंक्यपद पटकाविले होते.

जागतिक कुस्ती परिषदेने म्हटले आहे की, ‘ज्या सोळा खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे त्या सर्व खेळाडूंची जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीशी संलग्न असलेल्या मॉस्को येथील प्रयोगशाळेत उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळी हे खेळाडू दोषी आढळले होते. या सर्व खेळाडूंची रिओ येथील स्पर्धेपूर्वी उत्तेजक चाचणी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.’