20 September 2017

News Flash

हे कसले ‘इन्सान’?

बाबा रामरहीमच्या ताटाखालचे मांजर बनलेले हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकार हे त्याचे जळजळीत उदाहरण.

संतोष कुलकर्णी | Updated: August 28, 2017 1:20 AM

बाबा रामरहीम व मनोहरलाल खट्टर

बाबांच्या आशीर्वादाने सत्ता आणि सत्तेवरील पक्षाच्या पाठिंब्याने बाबांची (समांतर) सत्ता असा हा चक्रव्यूह पंजाब व हरयाणाचे राजकीय प्राक्तन आहे. ‘स्टेट्स विदिन स्टेट’ झालेल्या या बाबांच्या मागे असलेल्या आंधळ्या भक्तांच्या फौजांनी त्यांच्यापुढे लोटांगण घालण्याची वेळ लाचार राजकारण्यांवर आलीय. बाबा रामरहीमच्या ताटाखालचे मांजर बनलेले हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकार हे त्याचे जळजळीत उदाहरण..

सिरसा हे आपल्याकडील ‘ब’ वर्ग नगरपालिकेसारखे हरयाणा आणि पंजाबच्या सीमेवरील शहर. फेब्रुवारीत झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीचे वार्ताकन करण्यासाठी मी सुरुवात केली होती सिरसापासूनच. का? तर तेथील ‘ बाबा’बद्दल जाम उत्सुकता होती. कारण तो कोणत्याही अँगलने बाबा, संत, साधू नव्हता. त्याचे सत्संग म्हणजे लाखोंचे रॉक शो. अचकट-विचकट कपडे घालून फिरणारा हा बाबा स्वत:ला ‘देवाचा दूत’ मानायचा. प्रतिभावान लेखक, विचारवंत, संशोधक, सच्चा समाजसुधारक, स्वरांचा बादशहा, भ्रष्टाचारविरोधी जननायक, ‘प्रभावशाली लोकसंख्या नियंत्रक’ असा जंगी बायोडेटा घेऊन मिरवायचा.  तो चित्रपट काढायचा, त्यात तो आणि फक्त तोच असायचा. त्याच्यावर बलात्कार, खुनासारखे चार-पाच गुन्हे असतानाही राजकारणी नव्हे, तर नोकरशहा, उद्योगपती, बॉलीवूडची मंडळीही त्याच्या पायावर माथा टेकवायची. बाबाची एवढी महती का तर त्याच्या अनुयायांची अविश्वसनीय संख्या. ते लाखोंच्या संख्येने निश्चितच असतील.

हा बाबा म्हणजे ज्याच्या अटकेवरून हरयाणा आणि पंजाबमधील अभूतपूर्व हिंसाचारात ३६ जणांचा बळी गेला, तो गुरमीतसिंग रामरहीम! डेरा सच्चा सौदाचा सर्वेसर्वा. डेरा म्हणजे आपल्याकडील मठ. सिरसा हे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय. त्या दिवशी तर हजारोंच्या संख्येने आलेल्या बायाबापडय़ांची वर्दळ तिथे होती.  एवढय़ा मोठय़ा जनसमूहावर बाबाने कसे काय गारूड केले असावे, असा प्रश्न मनातून काही जात नव्हता. त्या दिवशी बाबा डेऱ्यातच होता. त्याची पत्रकार परिषद होती. बाबाला किती तरी प्रश्न विचारले. चित्रपटाबद्दल, नवनवीन प्रकल्पांबद्दल, पंजाब निवडणुकीतील पाठिंब्याबाबत.. पण एकानेही त्याच्याविरुद्धच्या बलात्कार आणि खून खटल्याचा प्रश्न विचारला नाही. धारेवर धरण्याचे तर लांबच.  बाबाने सर्वकाही ‘मॅनेज’ केले असणार आणि त्याला हात लावण्याची हिंमत कुणी करणार नसल्याचेच बहुतेकांनी गृहीत धरले असावे.

मात्र, अनपेक्षितपणे शुक्रवारी डेऱ्यातील दोन साध्वींवर बलात्कारप्रकरणी बाबाला पंचकुला न्यायालयाने दोषी ठरवले आणि पाहता पाहता हरयाणा व पंजाबमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. बाबाच्या हिंसक भक्तांचा नंगानाच काबूत आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात ३६ जणांचा जीव गेला. शेकडो जखमी झाले. आपल्याच शिष्यांवर बलात्कार करणाऱ्या बाबासाठी भक्तांच्या बेलगाम टोळक्यांनी केलेला प्रच्छन्न हिंसाचार पाहून सारा देश दिग्मूढ झाला. एका बलात्काऱ्यासाठी एवढा हिंसाचार? स्वत:च्या जिवाची पर्वा नसणारी एवढी आंधळी श्रद्धा कशी काय असू शकते? बाबाच्या भक्तांना ‘प्रेमी’ म्हणतात आणि त्यांचे शिष्यगण जातींचे निर्मूलन करण्यासाठी ‘इन्सान’ असे आडनाव लावतात. मग त्या दिवशी रस्त्यारस्त्यांवर हिंसाचार करणाऱ्या ‘प्रेमीं’मधील ‘इन्सान’ कुठे गेले होते? हे सगळे प्रश्न अनेकांना अस्वस्थ करणारे आहेत.

या पापाचे मुख्य धनी हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकार. बाबाविरोधात निकाल गेल्यास उमटणाऱ्या पडसादांची पूर्ण कल्पना असूनही पंचकुलामध्ये हजारो भक्तांना कसे काय जमू दिले गेले? जमावबंदीचे १४४वे कलम काय फक्त नावापुरते होते? या अक्षम्य हलगर्जीपणामागची दोनच कारणे असावीत. एक तर बाबाची सुटका गृहीत धरली असेल किंवा गावागावांहून आलेल्या झुंडीला अडविण्याचे राजकीय धाडस नसेल. एकीकडे कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान आणि दुसरीकडे राजकीय स्वार्थ. खट्टरांनी दुसऱ्याला पसंती दिली. खट्टरांचे सरकार हे बाबाच्या ताटाखालचे मांजर असल्याचे लपून राहिले नव्हतेच मुळी. किंबहुना मोदीलाट वगैरे ठीक आहे; हरयाणासारख्या ‘राजकीय वाळवंटा’मध्ये २०१४ ला कमळ फुलले होते ते बाबाच्या कृपेनेच. मोदींच्या जोडीला बाबा नसते तर ४ वरून थेट ४७ जागा भाजपला कधीच मिळाल्या नसत्या. त्यामुळेच बाबाच्या एवढय़ा ओझ्याखाली दबलेल्या खट्टरांनी त्याला दुखावण्याचा प्रश्नच नव्हता. झालेही तसेच. बाबाच्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार हे अगोदरच जाहीर झाले असताना, निकाल विरोधात गेल्यास भक्तांच्या झुंडी धुडगूस घालणार असल्याची माहिती असतानाही खट्टर शांत राहिले आणि हरयाणाला त्याची किंमत ३६ जणांचा बळी देऊन मोजावी लागली. एवढे होऊनही खट्टर यांची उचलबांगडी करण्यास भाजप तयार नाही. आजचा (सोमवार) शिक्षेचा दिवस शांततेत गेल्यास खट्टरांना अभय मिळालेच म्हणून समजा. त्यामागची राजकीय गणिते पक्की आहेत. एक तर खट्टर बहुसंख्याक जाटांविरोधी जनमताचा चेहरा बनलेत आणि एवढे होऊनही डेरा सच्चा सौदाला दुखावण्याची भाजपची अजिबात तयारी नाही. भाजपचे भवितव्य डेराच्या पाठिंब्याशी निगडित असल्याची पक्की समजूत भाजपने करून घेतलीय. त्यातूनच ज्यांच्या नाकाखाली हरयाणात तीनदा हिंसाचार झाले, त्या खट्टरांना पाठीशी घालण्यावर मोदी-अमित शहा ठाम असल्याचे दिसते आहे. नैतिकता आणि साधनशुचितेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संस्कृती भाजपने केव्हाच मोडीत काढलीय. शुद्ध राजकीय हेतूने खट्टरांना मिळणारे अभय हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणायला हरकत नाही.

या बाबाची आणि भाजपची चुंबाचुंबी २०१३पासून. ३० टक्के जाटांच्या जिवावर राजकारण करणाऱ्या धूर्त भूपिंदरसिंह हूडा यांना खाली खेचण्यासाठी भाजपने बाबाला जाळ्यात ओढले होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये सिरसामध्ये प्रचाराला आलेल्या मोदींनी बाबाच्या ‘पवित्र भूमीला वंदन’ केले होते. भाजपसाठी बाबा एवढे महत्त्वाचे होते, पण भाजपच नव्हे तर सर्वच राजकारण्यांसाठी बाबा ‘अ‍ॅसेट’. आज बाबा भाजपबरोबर असतील; पण यापूर्वी ते काँग्रेसकडे होते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी २००२, २००७ आणि २०१२ मध्ये बाबाच्या ‘सुपर आशीर्वादा’साठी आपले जोडे झिजविलेले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल असो वा आपल्या बहिणीच्या विजयासाठी बाबाच्या दर्शनास येणाऱ्या सुषमा स्वराज असो वा आज घडाघडा बोलणारे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणजित सूरजेवाला असो, सर्वपक्षीय नेते बाबाच्या दरबारात लोटांगण घालतात. खुद्द बाबाची सून ही काँग्रेसच्या माजी आमदारांची कन्या. हूडा आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला हेही बाबाला दुखावण्याच्या फंदात कधी पडले नाहीत. नाही तर २००२चा खटला २०१७ पर्यंत लांबलाच नसता. बाबाला चुचकारण्याच्या खेळात काँग्रेस माहीर होतीच; पण भाजपने तिला खूप वेगाने मागे टाकलेय एवढाच काय तो फरक.

राजकारण्यांना गर्दीची भूल पडते. बाबाकडे तर बारा महिने चोवीस तास गर्दी. बाबा आता खलनायक झाला असला तरी त्याच्या कथित लोकप्रियतेचे, जनसमूहावर गारूड करण्याच्या विलक्षण ताकतीचे गमक समजून घेतले पाहिजे. बाबाच्या विलक्षण प्रभावाच्या मुळाशी शीख समाजामधील घुसळण आहे. शिखांमधील वरिष्ठ जातींच्या (जट्ट शीख) वर्चस्वाला कंटाळलेल्या दलित शिखांचे बाबा प्रतिनिधित्व करतो. त्याचे जवळपास ८० टक्के शिष्यगण हे शीख आणि हिंदूंमधील दलित समाजातील आहेत. एका अर्थाने कनिष्ठ शिखांमधील जातीय अस्मितेचा ते प्रतीक आहेत. पंजाबात शीख दलितांना आणि हरयाणात हिंदू दलितांना नेता नाही, आवाज नाही, प्रतिनिधित्व नाही. ही पोकळी बाबाने भरून काढलीय. जोडीला डेरा सच्चा सौदाकडून मोठय़ा प्रमाणात सामाजिक कामे चालतात. त्यातून बाबा घराघरांत पोहोचला. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या चमत्काराच्या भाकडकथांना सामान्य माणूस सहज बळी पडतो. पंजाबातील माळवा प्रांत राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा. ११७ पैकी ६७ जागा असलेल्या या माळवा प्रांतात तर बाबाची लोकप्रियता अफाट. मग का त्याच्या मागे राजकीय नेते धावणार नाहीत? पंजाब निवडणुकीत बाबाने शेवटच्या क्षणी अकाली दल- भाजपला पाठिंबा दिला. त्याने आम आदमी पक्षाकडे चाललेल्या दलित मतांमध्ये फाटाफूट झाली आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळेच कॅ. अमरिंदर बाबाविरोधात बोलत नाहीत. काँग्रेसनेही बाबाविरोधात ‘ब्र’सुद्धा काढलेला नाही.

अशी ताकत असलेला गुरमीतसिंग हा काही पंजाब, हरयाणातील एकमेव बाबा नाही. डेरा सच्चा खंड आणि बियाँसजवळचा डेरा राधास्वामी हाही प्रभावशाली. पंजाब निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी डेरा राधास्वामीमध्ये थेट मुक्काम केला होता. थोडक्यात काय, तर विशिष्ट जातींचे प्रतिनिधित्व करून मतांची सौदेबाजी करणारे डेरे हे राजकीय प्राक्तन आहे. राजकारणी, नोकरशहा, उद्योगपती यांच्या अभद्र युतीने हे बाबा शक्तिशाली बनलेत. बाबांमुळे सत्ता आणि सत्तेवरील पक्षाच्या पाठिंब्याने बाबांची (समांतर) सत्ता असा हा चक्रव्यूह आहे.  त्यामुळेच डेऱ्यांच्या बुरख्याआडून ते करीत असलेल्या धंद्यांकडे सर्वच जण दुर्लक्ष करीत असल्याचे जळजळीत वास्तव आहे. बाबापुढील लोटांगण घालण्याची ही लाचारी आलीय ती मतपेढीने. स्वार्थी राजकारणाने पोसलेल्या भस्मासुराने असल्या बाबांना जन्म दिलाय.

आसाराम बापू, रामपाल आणि आता रामरहीम ही त्याची भळभळती उदाहरणे. आणखी काही रांगेत असतीलच. आज भाजपचे हात पोळले आहेत, उद्या इतरांचे पोळतील. बाबालोकांच्या चरणी लोटांगण घालणाऱ्या राजकीय नेत्यांनी गुरमीतसिंग प्रकरणातून एवढा जरी धडा घेतला तरी खूप बरे होईल.

First Published on August 28, 2017 1:20 am

Web Title: haryana cm manohar lal khattar relation with baba ram rahim
टॅग Baba Ram Rahim
 1. P
  Prabhakar More
  Aug 30, 2017 at 11:39 am
  राजकारण हे एक तमाशा व चुंबाचुंबी अगदी बरोबर आहे . श्रीमती इंदिरागांधी नी सुद्धा काँग्रेस साठी भिंधरवाला याना जवळ केले आणि नंतर स्वतः श्रीमती ह्यांना मृत्यालाच सामोरे जावे लागले.,आणि संपूर्ण जगात तमाशा आणि चुंबाचुंबी अविरत चालूच राहणार आहे ,आणि आपला देश आणि राजकर्ते बाबा ,श्री श्री , माता च्या चुंबाचुंबी पासून दूर राहू शकत नाहीत . धर्म हि फक्त अफू ची गोळी नसून , सायनाईड आहे . हे समस्त जनता जनार्धन समजाऊन घेणे त्यांच्याच हातात आहे .
  Reply
  1. J
   jai
   Aug 28, 2017 at 8:02 pm
   हि असली प्रकरणे येतात जातात आपण आपले आहोत तिथेच आज BJP उद्या काँग्रेस पर्वा तिसरे अजून कोण. कित्येक शतके आपण पारतंत्र्यात काढली लोकांनी आपल्यावर आक्रमण केले आणि राज्य सुद्धा..मानसिकता जो पर्यंत बदलत नाही..हे असेच चालू राहणार. मेरा भारत महान..
   Reply
   1. S
    Sudhir Karangutkar
    Aug 28, 2017 at 5:09 pm
    अरे क्सक्सक्सक्स कुलकबु कुलकर्णी तुमचा इंडियन एक्सप्रेस इतकी वर्षे काय बातम्या लिहायला गेला होता? आपल्या तसेच इतर वर्तमान पात्रांनी याची काली कृत्ये का बाहेर काढली नाही कां त्या निष्पप मुलींचा टाहो तुम्हला ऐकू आला नाही कि तुम्हीदेखील या बाबाची पाकिटे घेऊन गप्प बसला होतात का आता काँग्रेसची सुपारी घेऊन भाजपवर निशाणा साधत आहेत तुम्ही पत्रकार महावित मग इतकी वर्षे चालेल गोरख धंदा तुम्ही उघडकीस का नाही आणलात मा अटळ बिहारींनी ते पीडितेच्या पात्र सुमोटो म्हणून सिबिआई हुकूम दिला म्हणून तरी यांची काली कृत्ये बाहेर अली
    Reply
    1. S
     Sunil Barge
     Aug 28, 2017 at 5:00 pm
     रोखठोक व ठाम भूमिका घेतल्याबद्दल आभार व अभिनंदन
     Reply
     1. S
      Somnath
      Aug 28, 2017 at 4:09 pm
      एकाच पेपरचे दोन दिग्गज एकाच विषयावर लेखणी खरडतात त्यातही कुबेर संपादक असून मोदीसारकारविषयी जेवढी गरळ ओकत येईल तेवढी ओकत असतात.तुमच्या दोघांची जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्यांचे काय? काँग्रेसचे निर्णय न घेणे हे किती आत्मघातकी आहे याची प्रचिती येते.अटलबिहारी वाजपेयी सरकारने २००४मध्ये कारवाई सुरु केली मग १० वर्षे काँग्रेसचे सरकार असताना असल्या उपटसुमभ बाबाना मोकळे रान कोणी सोडले.सारासार विचार केला तर बाबांच्या चरणी लिन होणारी राजकीय पक्ष, िदा मिळाल्यानंतर मूग गिळून बसलेली पत्रकारिता,सवय घोषित समाजसुधारक आणि मेंढरासारखी वाहत जाणारी जनता हि तेव्हढीच जबाबदार आहे.स्वतःच्या आईबापाला जवळ असून भेटायला जाणार नाही पण अहोरात्र प्रवास करून जाणारी शिक्षित जनता बाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला जाते याचे खरे नवल वाटते. मातापित्यांच्या हातावर ज्यांना दहा रुपये टेकवण्याची इच्छा होत नाही ते बाबांच्या दान पेटीत भरभरून दान ओततात तेही तेव्हढेच अशा अराजकाला जबाबदार आहे.पत्रकारिता गारेगार ऑफिसात बसून पंगू झाल्यामुळे त्यांना फक्त राजकीय तमाशा महत्वाचा वाटतो.
      Reply
      1. V
       vivek
       Aug 28, 2017 at 12:58 pm
       आमचे पितळ उघडे पाडू नका सत्ते साठी कारवाई लागते सगळे लोकांच्या भावनांशी खेळावे लागते. काही जण मेले तर काय फरक पडतो. ते आमचे जवळचे नसले म्हणजे झाले. लोकांच्या धार्मिक भावना भडकवून मते लवकर मिळतात. मन कि बात मध्ये फक्त सुविचारी बोलून किती सुसंस्कृत आहे दाखवले कि झाले. स्वतःचा सुप्त अजेन्डा रेटायला तयार. एकीकडे विकासाचा जाप दुसरी कडे धार्मिक उन्माद पेटवला कि लोकांच्या लक्षात येत नाही किती विकास झाला. सत्ते साठी काहीही. राष्ट्रपती शासन, बाबाना पाठिम्बा,. गोपनीयता कायद्या विरोधात भूमिका घेऊन विरुद्ध निकाल आल्यावर त्याचे स्वागत करायचे सामान्य जनतेला काय कडतंय गोपनीयता मूल अधिकार असणे किती महत्वाचे आहे. काँग्रेस ने जे केले त्याच्याहून अधिक नीच आम्ही करू. फक्त जनतेला वायफळ गोष्टीत गुंतवून गोड गोड बोलून
       Reply
       1. D
        Dilip Harne ,Thane
        Aug 28, 2017 at 12:44 pm
        नमो व अशा नी प्राप्त परिस्थितीत बाबा प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.पण जनतेला हे कळत नाही या भ्रमात भक्तांनी राहू नये.आजचा लेख अगदी उत्तम ,पण भक्तांना मात्र बोचणारा आहे.
        Reply
        1. A
         Ajay Kotwal
         Aug 28, 2017 at 12:29 pm
         Dear Mr. Kulkarni what you are asking from people of India we are not going to change, we need these "BABAS" and more then us these politicians be them from any party need more, So this nexus is never ending
         Reply
         1. G
          Ganeshprasad Deshpande
          Aug 28, 2017 at 10:21 am
          सर, संतोष कुलकर्णी (आणि पर्यायाने तुम्ही) पुन्हा एकदा गोष्टी सोयीस्कर सोप्या करण्याचा प्रयत्न करताय. राजकारणातली गुरूबाजी इंदिराजी आणि धीरेंद्र ब्रह्मचारी इथपासून आहे ही याची एक बाजू आहे. सत्तेसाठी डेरासमोर लोटांगण घालण्यापासून भिंद्रनवालेंना हवा देण्यापर्यंत सर्व काही राजकीय पक्ष करतात. इंदिराहत्येनंतरच्या शीख हत्याकांडाचे पदासीन पंतप्रधान समर्थन करतात. ही याचीच दुसरी बाजू आहे. डेराच्या अनुयायांना चंदिगढमध्ये येण्यापासून रोखले असते तर तेव्हाच हिंसा भडकू शकली असती ही तिसरी बाजू. अशा परिस्थितीत तुम्ही आणि तुमच्या स्वतःला सर्व ज्ञानाचा अर्क समजणाऱ्या भावंडांनी अघोषित आणीबाणीची ओरड केली असती ही चौथी बाजू. सर, हिंसेबद्दलचा तुमचा संताप समजू शकतो. पण तुमच्या-माझ्यासकट आपण सगळे या हिंसेला जबाबदार आहेत. अतिरेक्यांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करण्याइतके आपण नालायक आहोत. तुम्ही खट्टरना काय म्हणून दोष देताय? आजही मधुर भांडारकरच्या इंदू सरकारला रस्त्यावर उतरून विरोध करणारे काय संदेश आम्हाला देताहेत? गोष्टी सोप्या करण्याने दिशाभूल होते. समस्या आकलन होत नाही. आम्ही सारे नंगे आहोत हा खरा प्रश्न आहे.
          Reply
          1. A
           arun
           Aug 28, 2017 at 7:16 am
           राजकारण्यांचा पैसा यांच्याकडे गुंतवला गेला आहे का ? income टॅक्स खात्याची याच्यावर आजवर कधीच गेली नाही ? ते कुणाचे आशीर्वाद ? भारतातील महाराज अम्मा त्यांच्याकडच्या बोचक्यांना कधीच हात लागत नाहीत. इतक्या लोकांचे बळी आणि वित्तीय हानी यांचं पाप भाजपच्याच माथी..ते काही वेगळ्या रंगाचे नाहीत.. फक्त सिंहाची कातडी गळून पडलेले कोल्हेच हेच परत दिसून आलं.
           Reply
           1. Load More Comments