अग्निशमन दलात फायर इंजिनीअर म्हणून काम करताना बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यापासून ते ‘ओएनजीसी’च्या पाइपलाइनमध्ये झालेल्या प्रचंड स्फोटाचा सामना करण्यापर्यंत अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या, नाजूकसाजूक बाईपणाचं गृहीतक निकालात काढत आगीशी खेळणाऱ्या असाध्य ते साध्य करणाऱ्या, रफ अ‍ॅण्ड टफ पहिल्या स्त्री फायर इंजिनीअर हर्षिणी कान्हेकर यांच्याविषयी..

गुजरातमधील म्हैसाणा जिल्ह्य़ाच्या एका गावातील शेताला आग लागते.. बघता बघता आगीचे लोळ सगळीकडे पसरू लागतात. शेतात घरही आहे.. लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळू लागतात. तिथून जवळच असलेल्या ‘ओएनजीसी’च्या फायर स्टेशनला आगीबद्दल कळवलं जातं. काही मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी येऊन पोहोचतं. फायर इंजिनीअरला माहिती देण्यासाठी लोक गाडीभोवती एकच गर्दी करतात आणि आश्चर्यचकित होतात. त्या गाडीतून चक्क एक तरुण स्त्री ऑफिसर उतरते.. गावकरी बघतच राहतात. गाडीत एक स्त्री काय करतेय? तोवर ती जमावाला बाजूला सारून त्वरित पुढची सूत्र हाती घेते. आग विझवते.. लोक निश्चिंत होतात..

एखाद्या जाहिरातीतील वाटावा असा हा प्रसंग

हर्षिणी कान्हेकर प्रत्यक्ष जगतात. आपल्या देशातील ‘पहिल्या महिला अग्निशमन अभियंता’ म्हणून त्या ओळखल्या जात असल्या तरी आज त्या ‘डेप्युटी मॅनेजर फायर सव्‍‌र्हिसेस, ओएनजीसी’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ‘आगीशी खेळ’ नेहमीचाच.. किंबहुना तेच त्याचं काम.. आणि ते सुद्धा त्यांनी स्वत:हून निवडलेलं.

शेतातील आग विझल्यानंतर लोक हर्षिणी यांचे अभिनंदन करण्यासाठी पुढे सरसावतात.. काही वेळापूर्वी साशंक आणि प्रश्नांकित नजरेने पाहणारे लोक आता विश्वासाने त्यांच्याशी बोलत असतात. ज्या स्त्रीचे शेतातील घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून त्यांनी वाचविलेले असते ती वृद्ध महिला त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देते तो क्षण हर्षिणी यांच्या मनाला स्पर्शून जातो. असे एक ना अनेक प्रसंग त्यांनी अनुभवले आहेत. त्या म्हणतात, ‘‘फायर इंजिनीअर म्हणून काम करताना आव्हानं पावला-पावलावर समोर येत असतात. गुजरातमधील ज्या म्हैसाणा जिल्ह्य़ात मी चार र्वष कार्यरत होते, तिथे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यापासून ते ‘ओएनजीसी’च्या पाइपलाइनमध्ये झालेल्या प्रचंड स्फोटाचा सामना करण्यापर्यंत अनेक प्रसंग अनुभवले आहेत. मला या क्षेत्रात काम करताना पाहून सर्वसामान्य लोक तर आश्चर्यचकित होतातच पण जेव्हा मी ‘ओएनजीसी’मध्ये प्रशिक्षणासाठी गेले होते तेव्हा  वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा आश्चर्य वाटले होते.’’

असेच आश्चर्य ‘नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेज’ला प्रवेशाच्या वेळी तिथल्या प्रवेश देणाऱ्यांनाही वाटल्याचे हर्षिणी सांगतात. ‘‘महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना आणि एनसीसी करीत असताना नेहमीच ‘वर्दी पहनना है’ या एकाच कल्पनेने आम्ही भारावून गेलो होतो. बीएस्सीनंतर लष्करी सेवेत जाण्याची इच्छा होती आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्नही सुरू होते. पुढे काय करायचे या विचारात असतानाच एक दिवस मित्राने सांगितले, तुला वर्दी घालायची आहे ना, फायर सव्‍‌र्हिसचे फॉर्म निघाले आहेत. प्रवेशासाठी या महाविद्यालयात गेले तोपर्यंत ते केवळ मुलांसाठीच आहे, याची कल्पना नव्हती. माझ्या वडिलांची एक सवय होती. मी कोणतीही परीक्षा देत असताना परीक्षेच्या अगोदर मला ते त्या महाविद्यालयात घेऊन जात. एक दिवस वडिलांसोबत नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेजमध्ये गेले. मात्र कॉलेजमध्ये प्रवेश करताच तेथील सर्वाच्या नजरा आमच्यावर खिळल्या. जिकडे जाल तिकडे प्रश्नार्थक नजरेनेच आमच्याकडे पाहिले जायचे. हे मुलांचे महाविद्यालय आहे, मुलांनाच अग्निशमन सेवेचे शिक्षण दिले जाते. तुला हे जमणार आहे का, अशा प्रश्नांनी तेथील लोकांनी भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर, हे मुलांचे महाविद्यालय आहे; लष्कर, नौदल किंवा दुसऱ्या एखाद्या क्षेत्राकडे वळा, असा सल्लाही तेथील तरुणांनी आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी दिला. अर्ज भरण्यासाठी आले तेव्हाही तेथील व्यवस्थापनातील एक जबाबदार व्यक्ती माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होते. महिला ३३ टक्के आरक्षणासाठी झगडत आहेत, असा टोमणाही त्यांनी माझ्यासमोर मारला. त्यांचे ते वागणे मला अजिबात आवडले नाही. सरळ त्यांच्या समोर गेले आणि सर, ३३ टक्क्यांवर विश्वास नाही तर मला ‘फिप्टी फिप्टी’ हवे आहे, असे त्यांना ठणकावून सांगितले. त्या वेळी एक मुलगी म्हणून मला जे अनुभव आले, तेव्हाच आपणही काही कमी नाही, हे दाखवून देण्याचा निर्धार केला. माझा या महाविद्यालयातील प्रवेश हा तेथील मुलांच्या-प्राध्यापकांच्या दृष्टीने अचंबित करणारा होता.’’

‘‘नागपूरचे नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेज हे आशियामधील एकमेव असून, तेथे केवळ ३० जागा असतात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून येथे प्रवेश दिला जातो. सर्व प्रकारचे अडथळे पार करीत मी प्रवेश घेतला. ज्या ज्या वेळी माझ्याबाबतीत हिला हे जमेल का, अशी शंका घेतली जात होती. त्यावर मला एकदा संधी तरी द्या आणि मग ठरवा, अशी माझी भूमिका होती. त्यामुळे त्या महाविद्यालयातील माझा प्रवेश ही माध्यमांसाठी ब्रेकिंग न्यूज ठरली.’’

‘‘अग्निशमन अधिकारी होताना अगदी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते अधिकारी होईपर्यंत पदोपदी बाईपणाची जाणीव करून दिली जात होती. प्रशिक्षण अत्यंत खडतर होते. स्त्री म्हणून अडचणी अनेक होत्या. तेथे माझे, पर्यायाने मुलींचे नाव खराब होऊ नये यासाठी कोणत्याही अडचणींचा कधी बाऊ केला नाही वा महिला म्हणून कधीही कोणाची सहानुभूती मिळविली नाही. आपण या महाविद्यालयातील एक ‘केस स्टडी’ असल्याने स्त्रियांच्या सन्मानाला ठेच लागू नये याची सतत खबरदारी घेतली. स्त्री म्हणून कधीच कसलीही सवलत घेतली नाही किंवा कुठेच कच खाल्ली नाही. कॉलेजच्या तीन वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही. मी हे सगळे निर्धाराने केले. त्यातून अग्निशमन सेवेतील पुरुषांची मक्तेदारी मोडीत निघाली आणि स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे दाखवून दिले,’’ असे हर्षिणी यांनी सांगितले.

खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची म्हैसाणा येथे नियुक्ती झाली. तोवर त्यांना या ठिकाणाचं नावही ठाऊकनव्हतं. त्या म्हणाल्या, ‘‘पोस्टिंगचं पत्र मिळाल्यावर मी आधी नकाशा आणून ठिकाण शोधलं.’’ तेथे रुजू झाल्यावर कामाला लगेचच सुरुवात झाली कारण त्यांच्या साहेबांनी थेट त्या भागाची ‘प्रमुख फायर इंजिनीअर’ म्हणून जबाबदारी दिली. हर्षिणी यांना त्यांच्या साहेबांचा हा निर्णय फार महत्त्वाचा वाटतो. त्या म्हणाल्या, ‘‘वरिष्ठांनी कधीच भेदभाव केला नाही. आधी हिला इतरांच्या हाताखाली काम करू दे. अनुभव घेऊ दे. मग जबाबदारी सोपवावी की नाही, हे ठरवता येईल. असा विचार मनात न आणता त्यांनी थेट मोठी जबाबदारी दिल्यामुळे मला प्रेरणा मिळाली. रात्री-अपरात्री कधीही ‘कॉल’ यायचा. मग लगेच गाडीवर चढायचं आणि निघायचं.’’ मोठय़ा जबाबदारीचं  काम. आव्हानंही मोठं होतं.

‘ऑइल अ‍ॅण्ड गॅस’ अर्थात ‘तेल आणि वायू’ या वेगळ्या आणि अतिसंवेदनशील क्षेत्रात फायर इंजिनीअर म्हणून काम करताना त्यात केवळ आग विझविणे हे एकच काम नाही. तर नेतृत्व करण्याबरोबरच इतर सहकार्याची मोट एकत्र बांधून ठेवणे, त्यांचे मॉकड्रिल घेणे, त्यांच्याबरोबर घटनास्थळी जाऊन ऑपरेशन सुरू करणे, त्यांना सूचना देणे अशी त्यांच्या कामाची पद्धत होती. त्या वेळची त्यांनी सांगितलेली ही एक आठवण त्यांच्या आव्हानांची प्रचीती देते. ‘‘एक प्रसंग असा होता की मी जो युनिफॉर्म घातला होता, तो एरवी घालतो तसा साधा म्हणजे अध्र्या बाहीचा शर्ट असलेला होता. अचानक कॉल आल्यावर मी होते तशीच तडक निघाले. कपडे बदलायलाही वेळ नव्हता. घटनास्थळी गेल्यावर परिस्थितीची कल्पना आली. आग विझवायला पुढे सरसावले होते, पण त्याच्या झळा माझ्या हाताला लागायला लागल्या. आग वाढत होती आणि आता अध्र्या बाहीचा शर्ट घालून पुढे जाणे शक्य नाही हे कळत होते, पण काम टाकून मागे फिरणेही शक्य नव्हते. सुदैवाने माझ्या सहकाऱ्यांच्या ते लक्षात आले. त्यांनी मला अडवले कारण आता आगीच्या झळांचे चटके बसू लागले होते. धोका वाढला होता. शेवटी माझा युनिफॉर्म त्यांनी आणून दिला. त्यानंतर मला पुढे जाता आलं. खरं तर या बारीक-सारीक गोष्टी असतात पण त्या फार महत्त्वाच्या असतात. वित्तहानी, जीवितहानी टाळायची असते आणि त्याचबरोबर स्वत:लासुद्धा काही होऊ  द्यायचं नाही, अशी ही दुहेरी कसरत असते.’’

मोठमोठय़ा शिडय़ा आणि पाण्याचे पाइप हाताळणं शारीरिकदृष्टय़ा कठीण काम. पण हर्षिणी यांनी प्रचंड मेहनत, नियमित व्यायाम करून स्वत:ला त्या योग्य बनवलं. त्यामुळे त्या हे काम लीलया पार पडतात, पण अनेकांना तेही आश्चर्याचं वाटतं. कारण बाई ही नाजूकसाजूक, ती तशीच कामं करणार हे गृहीतक, परंतु हर्षिणी यांनी ते गृहीतक आपल्या कर्तृत्वाने चुकीचं ठरवलं आहे. स्त्री आता कुठलंही ताकदीचं काम करू लागलेली आहे, याचे संकेतच हर्षिणीसारख्या स्त्रिया आता देऊ लागल्या आहेत. परंतु केवळ शारीरिक ताकद असून उपयोगी नसतं. साधनसामग्री हाताशी असते, त्याचं तंत्रसुद्धा अवगत असतं पण तारतम्य, प्रसंगावधान आणि भान या गोष्टी प्रसंगातूनच शिकाव्या लागतात, त्या कुठल्याही प्रशिक्षणात शिकवल्या जात नाहीत हे अनुभवातून गवसलेलं सत्यही हर्षिणी आवर्जून अधोरेखित करतात. ‘‘आमच्यासाठी प्रत्येक प्रसंग सारखाच आव्हानात्मक असतो, कारण तो प्रत्येक वेळी वेगळं रूप धारण करतो. ‘तेल आणि वायू’ क्षेत्रात फायर इंजिनीअरची भूमिका खूपच जास्त महत्त्वाची असते कारण हे क्षेत्र अति संवेदनशील आहे आणि इथे प्रत्येक क्षण आव्हानात्मक होऊ शकतो,’’ त्या सांगतात. सुनियोजन म्हणजे काय याची बाराखडी त्यांनी या क्षेत्रात आल्यावर गिरवली असली तरी तेवढय़ावर भागत नाही. हर्षिणी म्हणाल्या, ‘‘प्रसंगाचे गांभीर्य ओळखणे आणि त्यानुसार कमीत कमी वेळेत नियोजन करून पुढील कारवाई सुरू करणे यात ऑफिसरांचा कस लागतो.’’

तेल आणि वायू क्षेत्रातील फायर इंजिनीअर म्हणून इतरही अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. ऑपरेशन पूर्ण झाले तरी हर्षिणी यांची जबाबदारी संपत नाही. आग लागण्यामागचे कारण शोधणे, त्याची मीमांसा करणे, ते पुन्हा होऊ  नये म्हणून काय खबरदारी घेता येईल याचा अभ्यास करणे, फायर ऑडिट करणे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि उपाय सुचवायचे कामही करावे लागते. ‘ओएनजीसी’चे देशात अनेक ठिकाणी तेल प्रकल्प आहेत. त्या त्या ठिकाणी जाऊन त्या प्रकल्पांची पाहणी करणे, तेथील इतर अभियंत्यांकडून माहिती घेऊन आगीचा, तेलगळतीचा किंवा स्फोटाचा असा कुठलाही भयंकर प्रसंग ओढवणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे उपाय सुचविणे, नवीन पाइपलाइन टाकायची झाल्यास आणि विशेषत: ती मानवी वस्तीतून जाणार असल्यास त्या नवीन प्रकल्पासाठी प्रस्तावित ठिकाणांची पाहणी करून मार्गदर्शक तत्त्वे आखून देणे, त्याची अंमलबजावणी झाली आहे का ते पाहणे अशा अनेक अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील जबाबदाऱ्यांचे शिवधनुष्य आज हर्षिणी कान्हेकरांनी पेलले आहे. पण त्या इथेच थांबल्या नाहीत.

‘ओएनजीसी’चे काम जमिनीवर आणि खोल समुद्रात या दोन्हीही ठिकाणी चालते. त्यातील जमिनीवरील प्रकल्प हाताळण्याची जबाबदारी हर्षिणी यांनी समर्थपणे पेलली. त्यानंतर त्यांना वेध लागले ते खोल समुद्रात उभ्या असलेल्या तेल प्रकल्पांवर काम करण्याचे. पण तिथे स्त्रियांना प्रवेश नसल्याचे कळले. हर्षिणी यांनी मात्र हाही नियम बदलायला प्रशासनाला भाग पाडले आणि मुंबईनजीकच्या खोल समुद्रात असलेल्या ‘बॉम्बे हाय’च्या फलाटावर या पहिल्या महिला फायर इंजिनीअरचे पाऊल पडले. या अनुभवाबद्दल त्या खूप उत्साहाने आणि अभिमानाने बोलतात. ‘‘प्रशिक्षणादरम्यान मला ‘बॉम्बे हाय’ प्रकल्पावर जाण्याची संधी मिळाली होती. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आखलेली ती एक ‘व्हिजिट’ होती. मी एकंदरच या पदावर निवड झालेली पहिली स्त्री असल्याने आमच्या बॅचमध्येसुद्धा मी एकटीच स्त्री होते. हेलिकॉप्टरमधून तिथे उतरले तेव्हाच तेथील अधिकाऱ्यांना मला पाहून खूप आश्चर्य वाटले. इथे स्त्री अधिकाऱ्यांना प्रवेश नाही मग ही स्त्री कशी आली, असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता. त्या पहिल्या व्हिजिटच्या वेळीच मी ठरवलं की मला इथे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. मला केवळ तिथे भोज्जा करून परत यायचं नव्हतं तर तिथे राहायचं होतं. तसं मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं आणि त्यांनीही माझी हिंमत बघून मला परवानगी दिली.’’

बाईपणाचा बाऊ  न करता धैर्याने आगीशी दोन हात करण्यासाठी उभ्या ठाकणाऱ्या हर्षिणी यांना ‘लेडी फायर ऑफिसर’ हा शब्दच मान्य नाही. त्या म्हणतात, ‘‘पुरुषांना आपण जेन्टस् फायर ऑफिसर म्हणतो का? मग लेडी फायर इंजिनीअर असं का म्हणायचं? फायर इंजिनीअर हा फायर इंजिनीअरच असतो आणि आग विझविण्याचं आव्हान सगळ्यांसमोर सारखंच असतं. म्हणून तिथे लेडी-जेन्टस् अशी बिरुदं लावू नका.’’

त्यांच्या या विचारांमुळेच आज त्या या क्षेत्रात खूप पुढे गेल्या आहेत. ‘बॉम्बे हाय’सारख्या ठिकाणी स्त्रियांसाठी वेगळी चेंजिंग रूम वगैरे प्रकार नाहीत पण तिथेही ही बाई सहज जमवून घेते आणि आपल्या कामापुढे या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत, असं त्यांना ठामपणे वाटतं. हळूहळू या क्षेत्रात तरुणींचा प्रवेश होऊ  लागला आहे, पण या अवघड मार्गावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या हर्षिणी कान्हेकर यांच्या पाऊलखुणा इथे कायम राहणार आहेत. असाध्य ते साध्य करणाऱ्या ‘रफ अ‍ॅण्ड टफ’ हर्षिणी कान्हेकर आणि त्यांच्या धाडसाला सलाम!

मनीषा नित्सुरे-जोशी

manisha.nitsure@gmail.com