चित्रा पालेकर या अर्थशास्त्रात एमए असून त्यांची कलेतली कारकीर्द १९६७ मध्ये, मुंबईतल्या प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झाली. त्यांनी ‘थिएटर युनिट’, ‘रंगायन’, ‘अनिकेत’ इत्यादी संस्थांच्या हिंदी-मराठी नाटकांत भूमिका करत राज्य-नाटय़ स्पर्धेत बक्षिसे मिळवली. १९८०मध्ये त्या चित्रपट माध्यमाकडे वळल्या. त्यांची प्रथम निर्मिती व प्रमुख भूमिका असलेल्या ‘आक्रीत’ या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. ‘कच्ची धूप’, ‘नकाब’, ‘पाऊलखुणा’सारख्या दर्जेदार दूरचित्रवाणी मालिकांच्या पटकथा-संवाद लिहिल्यावर पुढे त्यांनी ‘थोडासा रुमानी हो जाये’, ‘कैरी’, ‘कल का आदमी’, ‘ध्यासपर्व’सारख्या कलात्मक चित्रपटांसाठीही पटकथा-संवाद लिहिले. ‘बनगरवाडी’ व ‘दायरा’साठी त्यांनी अतिरिक्त पटकथा-संवाद लिहिले, शिवाय वरील अनेक चित्रपटांसाठी सहदिग्दर्शक आणि निर्मिती-संकल्पक या भूमिकाही पार पाडल्या. ‘पोटर्रेट ऑफ अ विजनरी’ हा इंग्रजी माहितीपटदेखील त्यांनी तयार केला. स्वत:ची निर्मिती व पटकथा-संवाद असलेला, ‘माती माय’ हा त्यांचा दिग्दर्शक या नात्याने पहिला चित्रपट. तो १४ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महोत्सवांतून दाखवला गेला व त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले. याशिवाय, समलैंगिक व्यक्तींना समान हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

‘‘सात दशकांच्या माझ्या आयुष्यात इतरांशी शेअर करण्यासाठी अनेक गमतीशीर गोष्टी होत्या.. कधी हसवणाऱ्या, तर कधी अंतर्मुख करणाऱ्या. माझे अनेक छंद, नको ते उपद्व्याप, भरभरून प्रेम व प्रोत्साहन देणारं कुटुंब, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळवलेले मैत्र, जीवनाबद्दल खूप काही शिकवून गेलेली माणसं.मनातल्या कोपऱ्यात इथेतिथे दडून बसलेल्या या गोष्टी नजरेसमोर तरळायला लागल्या..’’त्याच आठवणींचा कोलाज म्हणजे हे सदर, दर पंधरवडय़ाने.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप

‘लगोरी’ हे शीर्षक माझ्या सदरासाठी मला सुचलं, त्या आधीची गोष्ट.

काही दिवसांपूर्वी अतिशय उत्साहाच्या भरात हे सदर लिहायला मी होकार दिला. नाही तरी, एखाद्या गोष्टीमुळे खूप उत्तेजित व्हायचं आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ त्यात उडी घ्यायची, ही माझी जुनी, नेहमीचीच सवय. आणि मग एकेक अडचण दिसायला लागल्यावर नखं चावत त्यावर उपाय शोधायचा, ही आणखी एक जोडसवय. तर या सदराच्या बाबतीत नेमकं तेच घडलं. मी भले लिहायचं ठरवलं तरी चांगला, नेमका विषय नको?

वास्तविक, खासगीत गप्पा मारताना मी तशी कुठल्याही विषयावर फाडफाड बोलू शकते. पण सार्वजनिक माध्यमातून बोलताना अथवा लिहिताना, मला ज्याची विशेष माहिती नाही अशा विषयावर ‘सखोल’ मतप्रदर्शन करायला, मी पेज-थ्री सेलिब्रिटी किंवा राजकारणी थोडीच आहे! त्यामुळे आपण कुठल्या विषयात तज्ज्ञ आहोत, याचा विचार करणं मला भाग पडलं आणि लवकरच लक्षात आलं की जवळजवळ कुठल्याच विषयात नाही!

मी ज्या विषयात एमएची पदवी प्राप्त केली, त्या विषयाकडे पूर्णपणे पाठ फिरवून त्यात तज्ज्ञ बनण्याची शक्यता मी स्वत:च घालवली होती. बरं कलेतल्या कारकीर्दीचं म्हणाल तर माझ्याकडे ना ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची पदवी, ना ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’ची. शिवाय, सतत आडवळणी नाटक-सिनेमांशीच हट्टाने संबंध ठेवल्यामुळे, लोकप्रियता व ग्लॅमरच्या साहाय्याने त्या क्षेत्रांत तज्ज्ञ बनणंही आता शक्य नव्हतं. क्षणभर वाटलं, दिलेला होकार मागे घ्यावा. पण तेही जमेना. अशा द्विधा मन:स्थितीत असताना अचानक माझ्या लक्षात आलं की ज्यावर मी हक्काने लिहू शकते, स्वत:ची मतं देऊ  शकते, अशी एक गोष्ट नक्कीच आहे. माझं स्वत:चं आयुष्य. अर्थात, स्वत:बद्दल लिहितेवेळी इतरांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचा किंवा इतरांना दोष देत स्वत:च्या कृतीचं समर्थन करण्याचा मोह झाला तर, अशी शंका मनात येऊन मी जराशी हडबडले. पण दुसऱ्याच क्षणी ती शंका मी दूर सारली. आजवर अशा गोष्टींत मला मुळीच रस वाटला नाही. उलट, त्यांच्यामुळे वेळेचा अपव्यय होतो, असंच वाटत आलं. त्यामुळे असल्या मोहांना मी बळी पडण्याची शक्यता नव्हती.

सात दशकांच्या माझ्या आयुष्यात इतरांशी शेअर करण्यासाठी अनेक गमतीशीर गोष्टी होत्या.. कधी हसवणाऱ्या, तर कधी अंतर्मुख करणाऱ्या. माझे अनेक छंद, नको ते उपद्व्याप, भरभरून प्रेम व प्रोत्साहन देणारं कुटुंब, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळवलेले मैत्र, कुटुंबाचाच भाग बनलेले सहकारी आणि कधी रागे भरत तर कधी समजूत काढत जीवनाबद्दल खूप काही शिकवून गेलेली माणसं, या सर्वाच्या आठवणी होत्या. अनपेक्षितपणे समोर उभे ठाकलेले, कधी थक्क करणारे, तर कधी गांगरवणारे प्रसंग होते. मागे वळून पाहताना चक्क खोटे वाटतील, असे चित्रविचित्र अनुभव होते. मनातल्या कोपऱ्यात इथेतिथे दडून बसलेल्या या गोष्टी जसजशा वर येऊन नजरेसमोर तरळायला लागल्या, तसतशी सदर लिहिण्याविषयीची माझी चिंता कमी होत गेली. पण ती पूर्ण नाहीशी होण्याआधीच सदराला शीर्षक देण्याची वेळ येऊन ठेपली आणि ते न सुचल्यामुळे मी पुन्हा विचारात पडले.

मात्र या वेळी मी ठरवलं की निव्वळ घटना किंवा प्रसंग यांच्या बाह्य़ तपशिलात अडकून न राहता, एकूण जगाकडे, त्यातूनही स्वत:च्या जगण्याकडे, मी आज कुठल्या दृष्टीने पाहतेय हे तपासायचं व त्यावरून शीर्षक नक्की करायचं. नकारात्मक किंवा उपहासात्मक वागणं मला फारसं जमत नाही. त्यामुळे तशी शीर्षकं मला नकोच होती. हळवी शीर्षकंही मी बाद केली. वास्तविक, हळवं व्हायला मला खूप आवडतं. पण हृदयात गलबलून आलेलं डोळ्यावाटे बाहेर पडत असतानाच, आपण मेलोड्रामा करतोय याची जाणीव होऊन मला हसू फुटतं. आता, हळवं होण्यातलं सुख एन्जॉय करता आलं नाही तर हळवं होण्यात काय मतलब? तर अशी एकेक वृत्ती बाजूला सारता सारता एका क्षणी माझ्या ध्यानात आलं की, जगण्याला खरं तर मी एक गमतीशीर खेळच मानते. कधी जिंकायला, तर कधी हरायला लावणारा; आज यशाच्या शिखरावर विराजमान असले तरी उद्या तिथे असेनच असं नाही व आज निराशेच्या गर्तेत गाडले गेले तरी उद्या पुन्हा यशाचं शिखर गाठणं अशक्य नाही, हे सांगणारा खेळ. मग हां हां म्हणता बालपणी खेळलेले अनेक खेळ आठवायला लागले.

लंगडी, आटय़ापाटय़ा, लपंडाव, खोखो, हुतुतू, लगोरी.. हे सर्व माझ्या पिढीचे, किंबहुना त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे खेळ. व्हिडीयो-गेम्स, कम्प्युटर-गेम्स इत्यादी महागडय़ा तांत्रिक खेळांनी मुलांच्या काया-वाचा-मनांवर ताबा मिळवण्याच्या खूप खूप आधीचे. चार भिंतींच्या आत एका जागी बसून खेळण्याऐवजी, मोकळ्या हवेत, उन्हापावसात, धावाधाव करत खेळायचे खेळ आणि त्यातल्या त्यात लगोरी माझ्या सर्वात आवडीचा. वाडीतल्या चौकात खडूने आखलेलं वर्तुळ. त्यात मधोमध एकावर एक रचलेल्या सात लगोऱ्या. टीममधल्या एकाने मन एकाग्र करत त्या लगोऱ्यांवर लक्ष केंद्रित करून नेम धरायचा आणि हातातला चेंडू फेकून त्या लगोऱ्या फोडायच्या. मग विरुद्ध टीमला चकवत सर्वानी त्या लगोऱ्या पुन्हा रचायच्या. महत्त्वाचं म्हणजे, टीममधला एक जण जरी चेंडू लागून आऊट झाला तरी अख्खी टीम हरणार. ती हरू नये म्हणून, किंबहुना ती जिंकावी म्हणून प्रत्येकाने जिवापाड प्रयत्न करायचा. निव्वळ स्वत:चा विचार करण्याऐवजी सतत टीमचा विचार करायला लावणारा लगोरीचा हा नियम, पुढे प्रायोगिक नाटकात अथवा समांतर चित्रपटात काम करताना माझ्या उपयोगी यावा म्हणून बनवला असेल का?

या खेळाचं सर्वात मोठं वैशिष्टय़ म्हणजे आपणच लगोऱ्या फोडायच्या नि मग सर्व अडथळ्यांचा सामना करत, अतिशय हिरिरीने आपणच त्या पुन्हा रचायच्या! विध्वंस व पुनर्निर्मिती या दोन्हींची जबाबदारी फक्त आपलीच!! वाटलं, हा खेळ तर आपल्या आयुष्याचं हुबेहूब प्रतिबिंब आहे. त्याचबरोबर अशीही जाणीव झाली की लगोरीच्या या खेळात व आपल्या आजच्या जगण्यात आणखी एक दुवा आहे.. आनंद. जिंकण्या-हरण्याच्या पलीकडे घेऊन जाणारा, यशापयशाची चिंता न करता कृती करत राहिल्याने मिळणारा. जगण्यामरण्याचा प्रश्न असल्यासारखं खेळणं नि हसत-खेळत जगणं, यातला आनंद.

मग काय, लहानपणी जिंकल्यावर ओरडायचे त्याप्रमाणे लगोरीऽऽऽऽ अशी मी आनंदाने आरोळी ठोकली आणि सदराचं शीर्षक पक्कं केलं.

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com